लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वाघाचे अवयव खरेदी करण्यासाठी ग्राहक हेरून विकण्यासाठी आरोपी चक्क उमरेड बसस्टॅंडजवळ आले होते. मात्र, वन विभागाच्या पथकाला याची कुणकुण लागली आणि सौदा पूर्ण होण्याच्या आतच या टोळीला पकडण्यात आले आली. या प्रकरणी पाच व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.
अटकेतील आरोपी चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील असून यात ताराचंद नेवारे (खडकाळा), दिनेश कुंभले, अजय भानारकर (वाढोणा), प्रेमचंद वाघाडे, राजू कुळमेथे (सोनपूर तुकूम) यांचा समावेश आहे. या सर्वांविरुद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ च्या विविध कलमांनुसार वनगुन्हा नोंदविण्यात आला आहे.
वाघाच्या दातांची आणि अवयवांची विक्री उमरेड बसस्थानकाजवळ होणार असल्याची माहिती नागपूर वनविभागाला गोपनीय सूत्रांकडून मिळाली होती. त्यानुसार दक्षिण उमरेड वनपरिक्षेत्राच्या पथकाने सापळा रचला. यात मोठ्या शिताफीने तीन आरोपींना आधी अटक करण्यात आली. त्याच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीवरून सायबर सेलच्या मदतीने पुन्हा दोघांना पकडण्यात आलेे. वनसंरक्षक एन.जी. चांदेवार, कोमल गजरे यांच्यासह दक्षिण उमरेड व उत्तर उमरेड वनपरिक्षेत्रातील वनकर्मचाऱ्यांनी कारवाई पार पाडली.
अटकेतील आरोपी वन व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष !
अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी राजु कुळमेथे हा संयुक्त वन व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष आहे. तर, ताराचंद नेवारे हा पीआरटीचा सदस्य आहे. ज्यांच्यावर वन संरक्षणाची जबाबदारी आहे, तेच अशा तस्करीमध्ये गुंतले असल्याने याची पाळेमुळे किती खोलवर असावी, याची कल्पना येते. या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग असल्याचा संशय वनविभागाला असल्याने ही संख्या वाढण्याची शक्यता वनसंरक्षक चांदेवार यांनी व्यक्त केली आहे.