‘पुनरावृत्ती’ टाळण्यासाठी खबरदारी : मुंबईहून आली तीन; अतिरिक्त स्थानिक वाहनेही सज्ज नागपूर : उपराष्ट्रपती मो. हमीद अन्सारी यांच्या नागपूर दौऱ्यादरम्यान कुठलीही गडबड होऊ नये. खास करून वाहनांच्या बाबतीत आठवडाभरापूर्वीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सुरक्षा यंत्रणेने खास खबरदारी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर, उपराष्ट्रपती आणि अन्य अतिमहत्त्वांच्या व्यक्तींच्या कन्वॉयकरिता पाच बुलेटप्रूफ वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. सोबतच तीन अन्य वाहने सुसज्ज ठेवण्यात येणार आहेत. नागपूर नागरिक सहकारी बँकेचा ५५ वा स्थापना दिवस समारंभ शुक्रवारी सायंकाळी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात पार पडणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपराष्ट्रपती उपस्थित राहणार आहेत. त्यांचे नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुपारी ४.४० च्या सुमारास आगमन होईल. तेथून ते कार्यक्रमस्थळी जातील. त्यांच्यासोबत राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी हेसुद्धा राहणार आहेत. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी खास बंदोबस्त केला आहे. गेल्या आठवड्यात नागपुरात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बुलेट प्रूफ वाहन ऐनवेळी विमानतळावर बंद पडले. ते सुरूच होईना. त्यामुळे मुख्यमंत्री आमदार समीर मेघेंच्या वाहनात बसून हिंगण्यातील कार्यक्रमाला गेले. या प्रकारामुळे सुरक्षा यंत्रणेत एकच खळबळ उडाली. नागपूरसह, मुंबई आणि दिल्लीतही त्यासंबंधाने ‘गरमागरम‘ चर्चा झाली. या प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सुरक्षा यंत्रणेने विशेष खबरदारी घेतली आहे. उपरोक्त चार अतिमहत्त्वाच्या व्यक्ती एकाच वेळी येणार अथवा वेगवेगळ्या वेळेला येणार ते स्पष्ट झाले नसले तरी ऐनवेळी धावपळ नको म्हणून एकूण पाच बुलेटप्रूफ वाहनांची एकाच कन्वायमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)सुरक्षेचाही गराडा उपराष्ट्रपती यांच्या सभोवताल विशेष सुरक्षा पथकाचा गराडा राहणार आहे. त्यासाठीसुद्धा ठिकठिकाणचे अधिकारी येथे आज दाखल झाले. त्यांच्यासोबत स्थानिक एसपीयूच्या स्थानिक युनिटचे अधिकारी आणि कर्मचारी राहणार आहेत. त्यांच्या मदतीला स्थानिक पोलिसांचा प्रचंड ताफा राहील. सुरक्षेची आवश्यक ती संपूर्ण तयारी करण्यात आल्याचे पोलीस आयुक्त शारदाप्रसाद यादव यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
उपराष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी पाच बुलेटप्रूफ वाहने
By admin | Published: July 08, 2016 3:05 AM