नागपूर : उपराजधानीतील निर्ढावलेल्या लॅण्ड माफियांनी सर्वसामान्यांची मुस्कटदाबी करून सरकारी यंत्रणांच्या डोळ्यात धूळफेक चालविल्याचे दोन मोठे प्रकरण उघड झाले असून, पोलीस आयुक्तांकडे त्याची तक्रार झाल्यामुळे ही बनवाबनवी उघडकीस आली आहे. या प्रकरणातील आरोपी आपल्या रडारवर असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे संकेत पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी आज दिले आहे.
प्राप्त माहितीनुसार, गिट्टीखदानमधील ही जमीन आहे. बाजारभावानुसार या जमिनीची किंमत आज घडीला किमान ५ कोटी रुपये आहे. एका भूमाफियाने आपल्या साथीदारांना हाताशी धरून या जमिनीच्या खरेदी विक्रीचा व्यवहार केला. ती केवळ ८० लाखांत विकत घेतल्याचे दाखविण्यात आले. भूमाफियाने ८० पैकी कथित जमीनमालकाला ६० लाख रुपये रोख दिले. तर २० लाखांचा चेक देण्यात आल्याचे कागदोपत्री नमूद करण्यात आले. संबंधित जमीनमालकाला त्याची माहिती मिळाल्यानंतर त्याने थेट पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली. आयुक्त अमितेशकुमार यांनी कागदपत्रे तपासली तेव्हा भूमाफियाने ५ कोटींची जमीन ८० लाखांत विकत घेताना स्टॅम्प ड्यूटी मात्र ४ कोटींची भरल्याचे उघड झाले. दुसरे म्हणजे, ज्याला २० लाखांचा चेक देण्यात आला होता, त्याने बँकेत नेऊन २० लाख रुपये विड्रॉल करण्यात आले. त्यातील १९ लाख रुपये भूमाफियाने परत घेतल्याची माहिती दिली. हा सर्व गोलमाल उघड झाल्याने पोलीस आयुक्तांनी भूमाफिया आणि त्याच्या साथीदारांवर नजर रोखली असून, लवकरच त्याच्या मुसक्या बांधण्यात येईल, अशी माहिती आयुक्तांनी आज पत्रकारांना दिली.
---
तीन एकड छोड दे...
दुसरे प्रकरण १३ एकर जमिनीचे आहे. भूमाफियाने साथीदाराच्या मदतीने या जागेवर कब्जा मारला. त्याची बनावट कागदपत्रेही तयार केली आणि ती जमीन आपलीच म्हणून भूमाफियाने मूळ मालकावर प्रचंड दडपण आणले आहे. तुला ही जमीन पाहिजे असेल तर १३ पैकी ३ एकर जमीन मला द्यावी लागेल, तरच कब्जा सुटेल, असेही त्याने सांगितले आहे. विशेष म्हणजे, भूमाफियाची ही ऑडिओ क्लीपही पोलिसांकडे पोहोचल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली असून, या प्रकरणात जास्तीत जास्त कडक कारवाई केली जाईल, असेही सांगितले आहे.
---