आॅनलाईन लोकमतचिमूर (चंद्रपूर) : ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाशेजारी असलेल्या तळोधी- वनपरिक्षेत्रातील मानेमोहाडी शेतशिवारात बिबट्याने पाच जणांवर हल्ला करून जखमी केले. ही घटना गुरुवारला १२ वाजताच्या सुमारास घडली.उन्हाळ्याच्या दाहकतेने जंगलातील पाणवठे आटले आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांची पाण्यासाठी गावाजवळ भटकंती सुरु आहे. गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे गिरीधर मुडरे व विलास जीवतोडे हे शेळ्या घेऊन जात असताना दबा धरुन बसलेल्या बिबट्याने दोघांवरही हल्ला चढविला. यात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यानंतर रस्त्याने जाणारे दौलत धाडसे (५५) रा. करबडा यांच्यावरही बिबट्याने हल्ला करून जखमी केले.बिबट्याच्या हल्ल्याची वार्ता गावात पोहचताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, वनविभाग व पोलीस विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहचण्यापूर्वी राजू चौधरी (४८) रा. चिमूर व अमोल ठेकेदार हे तिथे बिबट बघण्यासाठी गेले होते. मात्र बिबट्याने त्यांच्यावरही हल्ला चढविला. पाचही जखमींना चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे.
ताडोबाजवळ बिबट्याच्या हल्ल्यात पाच जखमी
By admin | Published: May 18, 2017 6:31 PM