लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशाच्या विविध राज्यांमध्ये १ ते ३० एप्रिलपर्यंत असलेल्या लॉकडाऊनमध्ये रात्रीचा कर्फ्यू, साप्ताहिक, आंशिक आणि पूर्ण लॉकडाऊनचा समावेश आहे. महाराष्ट्रात पुन्हा १५ मेपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. एप्रिलपर्यंतच्या लॉकडाऊनमध्ये देशात जवळपास ३.५ लाख कोटींचा किरकोळ व्यवसाय आणि १.५ लाख कोटींचा घाऊक व्यवसाय ठप्प झाला आहे. हे नुकसान कधीही भरून न निघणारे असल्याचे मत देशातील देशातील किरकोळ व्यापाऱ्यांची शिखर संघटना कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) एका सर्वेक्षणाद्वारे व्यक्त केले आहे. यंदा केंद्र सरकारकडून पॅकेजची अपेक्षा व्यापारी करीत आहेत.
कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया म्हणाले, किराणा, दूध, भाजीपाला, फळांव्यतिरिक्त नागरिक वस्तू केवळ ई-कॉमर्सच्या माध्यमातून मागवीत आहेत. लॉकडाऊन असल्याने घराजवळील दुकानात लोक आवश्यक वस्तूच्या खरेदीसाठी जात आहेत. आंतरराष्ट्रीय व्यापार पूर्णपणे बंद आहे. केवळ ग्राहकच नव्हे तर व्यापारीही चिंताग्रस्त आहेत. जर दुकाने उघडल्यास कोणताही व्यापारी, त्यांचे कर्मचारी अथवा ग्राहकांना कोरोना संसर्ग झाल्यास सद्यस्थितीत वैद्यकीय सुविधा मिळणे कठीण आहे. यंदा कोरोना महामारीत अनेक व्यापारी संक्रमित झाले आहेत, तर अनेकांचा मृत्यू झाला आहे. कॅटने देशात ऑनलाईन सर्वेक्षण सुरू केले असून, ३० एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे.
या सर्वेक्षणात व्यापारी व नागरिकांपासून आरोग्य सुविधा आणि लॉकडाऊन वा अन्य पर्यायाचा विचार होत आहे. यासंदर्भात प्रत्येकाचे मत जाणून घेण्यात येत आहे. याशिवाय बाजाराची स्थिती, लॉकडाऊन आणि ग्राहकांच्या खरेदीच्या स्वभावाच्या आधारावर डाटा गोळा करण्यात येत आहे. याशिवाय सर्व प्रमुख व्यापारी संघटनांची व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन महामारीच्या काळात काय करावे, यावर विस्तृत चर्चा करण्यात येणार आहे. कोरोना काळात वैद्यकीय सुविधांच्या अभावामुळे व्यापाऱ्यांसह नागरिकांमध्ये भयावह स्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा आणखी काही दिवस सामना करावा लागणार आहे. त्यानंतरही व्यवसाय कसा राहील, यावर व्यापाऱ्यांमध्ये चिंता आहे. यावर विचार करून केंद्र सरकारने यंदाही व्यापाऱ्यांसाठी पॅकेजची घोषणा करावी.