लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील पाच अल्पवयीन मुलींसह सात जणी बेपत्ता झाल्याची घटना उजेडात आली आहे. याप्रकरणी पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून गुरुवारी विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल झाले.
मानकापूरमधील मुलगी १७ वर्षांची आहे. वाठोड्यातील १७ वर्षांची, तर एमआयडीसीतीलही मुलगी १७ वर्षांची आहे. वेगवेगळ्या वेळी या तीनही मुली घरून निघून गेल्या. गुरुवारी पोलिसांकडे तशा तक्रारी आल्या.
कळमण्यातील १६ आणि १७ वर्षांच्या दोन मुली २३ मार्चला घरून निघून गेल्या, तर कपिलनगरातील १९ वर्षांची तरुणी आणि अजनीतील ३० वर्षे वयाची विवाहिता २२ मार्चपासून बेपत्ता आहे. या सर्व मुली आणि महिलेच्या कुटुंबीयांनी नातेवाईक आणि मित्रमंडळींकडे त्यांचा शोध घेतला. त्यांचा पत्ता न लागल्यामुळे पालकांनी अनुक्रमे मानकापूर, वाठोडा, एमआयडीसी, कळमना, कपिलनगर, तसेच अजनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी या सर्व प्रकरणात अपहरणाचा गुन्हा दाखल केला. त्यांना फूस लावून पळवून नेले असावे, असा संशय असून, पोलीस त्यानुषंगाने बेपत्ता मुली, महिलेचा शोध घेत आहेत.