लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाचा (यूपीएससी) २०१७ वर्षाचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. यात नागपुरातील नागरी सेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षण केंद्राच्या पाच विद्यार्थ्यांनी यश मिळवित नागपूरचा टक्का वाढविला आहे. यात आशिष येरेकर (रँक ४५६), किरण सावंडकर (रँक ४५९), विराग तिडके (रँक ४९७), नीलेश तांबे (रँक ७३३), निखिल दुबे (रँक ९२६) यांचा समावेश आहे. केंद्रातून एकूण ६० पैकी १५ विद्यार्थ्यांनी नागरी सेवा (मुख्य) परीक्षेत यश संपादन करून मुलाखतीत सहभाग घेतला होता.नागपुरातील राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या (एनएडीटी) सात प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनीही ‘यूपीएससी’ बाजी मारली आहे. यात आशिमा मित्तल (रॅँक १२) व अभिलाषा अभिनव (रँक १८) यांचा समावेश आहे. आशिमा मूळची राजस्थानच्या जयपूर येथील आहे तर अभिलाषा मूळची झारखंडची आहे. आशिमा व अभिलाषाने पदवीपर्यंतचे शिक्षण मुंबईत पूर्ण केले. याशिवाय एनएडीटीत प्रशिक्षण घेत असलेल्या एका दुसऱ्या उमेदवाराने नागरी सेवा परीक्षेत ८८ वी रॅँक मिळविली आहे. मूळचा नागपूरचा असलेला अर्चित चांडक याने १८४ वी रॅँक मिळविली. एनएडीटीमधून यावर्षी ६० प्रशिक्षणार्थी आयआरएस अधिकाऱ्यांनी परीक्षेत भाग घेतला होता. यातील १० उमेदवारांच्या रॅँकिंगमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत सुधारणा झाली. त्यांची निवड आयएएससाठी झाली आहे. १५ उमेदवारांच्या रँकिंगमध्ये फार थोडी सुधारणा झाली. त्यांना भारतीय पोलीस सेवेत व भारतीय विदेश सेवेची संधी मिळण्याची अपेक्षा आहे. यात गोविंद मोहन (रँक २६०), ब्रिजशंकर (रँक २७३), रितेश भट (रँक ३०२), अक्षय बोधानी (रँक ३६५) व अरुण सैरावत (रॅँक ४४९) यांचा समावेश आहे.
हिंमत नाही हारलीआशिमा व अभिलाषाची ही तिसरी वेळ होती. पहिल्या वेळी दोघींनाही नागरी सेवा परीक्षेत यश मिळाले नाही. त्यानंतरही त्यांनी हिंमत हारली नाही. आणखी परिश्रम घेतले. दुसऱ्या प्रयत्नात आशिमाला ३२८ वी रँक मिळाली होती तर अभिलाषाला ३०८ वा रँक मिळाली होती. त्यामुळे त्यांना विश्वास होता की, यावेळी अधिक चांगले यश मिळेल. त्यामुळे त्यांनी तयारी सुरू ठेवली. दोघांचेही एकच लक्ष्य होते, ते म्हणणे आयएएस बनायचेच.
निकाल जाणून घेण्यासाठी उत्सुकनागरी सेवा परीक्षेची मुलाखत दिल्यानंतर सर्व उमेदवारांना निकालाची उत्सुकता होती. शुक्रवारी वेबसाईटवर निकाल घोषित होण्याची सूचना मिळताच ते इंटरनेटवर लक्ष ठेवून होते. रात्री उशिरा निकाल घोषित झाले. परंतु वेबसाईट सुरु होत नसल्याने त्यांची उत्सुकता ताणली जात होती. कुटुंबीयांकडूनही फोनवर फोन येत होते. काही वेळानंतर वेबसाईट सुरु झाली. सर्व गुणवत्ता यादीत आपले नाव शोधू लागले. मनासारखा निकाल लागल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.