नागपूर : सध्या अवकाशात ५ ग्रह एका रेषेत दिसत असल्याची बातमी साेशल मीडियावर फिरत आहे. ते ग्रह एका रेषेत असले तरी दिसतील याची मात्र खात्री नाही. मंगळ, बुध, गुरू, शुक्र व युरेनस अशी या ग्रहांची यादी आहे; पण, वास्तव लक्षात घेऊनच आकाशाकडे बघा, असे आवाहन खगाेल अभ्यासकांनी केले आहे.
सध्या पाचही ग्रह जवळून परिक्रमा करीत आहेत. चंद्रासाेबत त्यांचे विलाेभणीय दृश्य पाहण्याची उत्सुकता सर्वांना आहे. बुध आणि गुरू सध्या सूर्याजवळच्या स्थितीत असल्याने सूर्यास्तानंतरच्या संधीप्रकाशात हे दोन्ही ग्रह दिसणे शक्य नाही. सूर्यास्तानंतर फक्त अर्धा तास हे दोन्ही क्षितिजावर असतील आणि पूर्ण अंधार पडेपर्यंत ते मावळतील. शुक्र तेजस्वीपणे चमकतो आहे. त्यामुळे हा ग्रह रात्री १० पर्यंत पश्चिमेला दिसत राहील. चंद्राजवळ मंगळ ग्रह दिसतो आहे व तो १२ वाजेपर्यंत दिसत राहील. आज चंद्र आणि मंगळ मिथुन राशीत आहेत. बुधवारी ताे कर्क राशीत निघून जाईल. शुक्र आणि मंगळच्या मध्यभागी असणारा युरेनस हा ग्रह प्रचंड मोठ्या (८ ते १० इंची) दुर्बिणीशिवाय दिसतच नाही. त्यामुळे युरेनसचा विचार करूच नये. त्यामुळे चंद्राजवळ दिसणारा मंगळ ग्रह आणि पश्चिमेचा शुक्र हे दोन ग्रह पुढचे दोन महिने रोज सायंकाळी दिसत राहतील.
रमन विज्ञान केंद्र दाखविणार ग्रह
रमन विज्ञान केंद्र व तारामंडळाद्वारे येत्या १ एप्रिल राेजी गाेरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयात अवकाश निरीक्षणाची संधी उपलब्ध करण्यात आली आहे. केंद्रातर्फे यासाठी ३ ते ५ टेलिस्काेप लावण्यात येणार आहेत. सायंकाळी ६:३० वाजतापासून चंद्रासाेबत मंगळ व शुक्राची भेट स्पष्ट पाहता येईल, अशी माहिती केंद्रातर्फे देण्यात आली आहे.