ऑनलाईन लोकमतनागपूर : सांगली शहर पोलीस ठाण्यातील कोठडीत जबर मारहाण झाल्याने अनिकेत कोथळे याच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह दोन पोलीस हवालदार, एक पोलीस शिपाई आणि एक पोलीस वाहन चालक अशा एकूण पाच जणांना शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत उपस्थित एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.कवलापूर ता. मिरज जि. सांगली येथील अभियंता संतोष गायकवाड यांची फसवणूक केल्याप्रकरणी अनिकेत कोथळे व सुनील भेंडारे रा. भारतनगर या दोघांना सांगली शहर पोलिसांनी अटक केली होती. अटकेत असलेला आरोपी अनिकेत कोथळे यास पोलिसांनी जबर मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा सखोल तपास सुरू आहे. पोलीस कोठडीत मरण पावल्याने हे प्रकरण दडपण्यासाठी पोलिसांनी कोथळे याचा मृतदेह आंबोली जि. सिंधुदुर्ग या घाटात नेऊन जाळल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत सखोल तपास सुरू आहे. आतापर्यंत झालेल्या तपासात सांगली शहर पोलीस स्टेशन येथील एक पोलीस उपनिरीक्षक, दोन पोलीस हवालदार, एक पोलीस शिपाई, एक वाहन चालक व एक खासगी इसम यांचा या गुन्ह्यात समावेश असल्याचे आढळून आल्याने त्यांना अटक करण्यात आली असून सर्व आरोपी न्यायालयीन काठोडीत आहेत.सदस्य संतोष दानवे, नारायण कुचे, अॅड. यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार, अमर काळे, असलम शेख, डॉ. संतोष टारफे आदींनी हा प्रश्न उपस्थित केला होता.