लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: केवळ रस्त्यावरून धावण्याची मॅरेथॉन आपल्याला माहीत आहे. पण भयाण वाळवंटातील बाभूळ आणि कॅक्टर्सच्या काटेरी उंचसखल भागात ‘नो मॅन्स लॅन्ड’ अर्थात ‘निर्मनुष्य प्रदेशात’ मॅरेथॉन दौड कच्छ वाळवंटातील ढोलावीरा येथे पाच वर्षांपासून ‘रन द रान’ नावाने होत आहे. ठराविक मार्ग जीपीएसच्या माध्यमातून धावणाऱ्यांना स्वत: शोधून लक्ष्य गाठावे लागते.नागपूर रनर्स अकादमीच्या दोन महिलांसह पाच धावपटूंनी यात भाग घेत चमक दाखविली. गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत या धावपटूंनी अनुभव कथन केले. ५१ किमी शर्यतीत कल्याणी आकाश सतिजाला महिला गटात दुसरे स्थान मिळाले. याच गटात प्रसिद्ध स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. दंदे रुग्णालयाच्या संचालिका डॉ. सीमा पिनाक दंदे यांनी पाचवे स्थान पटकावले़दोघींचे प्रशिक्षक अतुलकुमार चौकसे हे १६१ किमी अंतराच्या शर्यतीत सातव्या स्थानी राहिले. ते म्हणाले ,‘ २ ते ४ फेब्रुवारीदरम्यान झालेल्या मॅरेथॉनमध्ये १६१, १०१ व ५१ किलोमीटर अंतराच्या तीन शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. १४१ स्पर्धकांमध्ये शहरातील पाच धावपटूंनी पहिलांदाच यात सहभाग दर्शवित उल्लेखनीय कामगिरी केली.’ ३ फेब्रुवारीला सकाळी ७ वाजता कच्छ मिठागारातून शर्यत सुरू झाली. शर्यतीत धावपटूंना मार्ग हा ग्लोबल पोजिशनिंग सिस्टीम (जीपीएस) याद्वारेच मिळत होता. १६१ किमी अंतराच्या दौडीत मी ३३ तास ५३ मिनिटे ४६ सेकंद वेळ घेत सातवे स्थान पटकावले. कल्याणीने ५१ किमी दौडीत ९ तास ४२ मिनिटे ३४ सेकंद, सीमा यांनी ११ तास २३ मिनिटे १९ सेकंद वेळेची नोंद केली. याच गटात पुरुषांमध्ये आशिषकुमार चौकसे ७ तास ५८ मिनिटे ३ सेकंदासह चौथ्या स्थानी राहिला. मधुसूदन ऊर्फ आकाश गर्ग यांनी ९ तास ४२ मिनिटे ३६ सेकंद वेळेसह १६ वे स्थान संपादन केले.
खडतर अनुभव‘‘रेती, मिठागार प्रदेश, खडकाळ, छोटे पहाड, डोंगर, काटेरी जंगलाचा प्रवास अशा खडतर मार्गातून वाटचाल केली. १२ तासात ५१ किलोमीटर अंतर गाठण्याचे लक्ष्य होते. मात्र, ते पूर्ण करण्यासाठी ‘जीपीएस’द्वारे मार्ग निश्चित करावा लागत होता. कठीण असलेल्या या शर्यतीत बरेच काही शिकायला मिळाले. अधिक मोठी आव्हाने पेलण्याची क्षमता आली आहे.’’
- कल्याणी सतिजा