नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी ३४ प्रतिष्ठानांवर कारवाई करून १ लाख ३९ हजाराचा दंड वसूल केला. यावेळी पथकांनी ६० प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. कोविड-१९ च्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या सतरंजीपुरा झोन क्षेत्रातील बोहरा मशीद जवळील होल्लाराम फत्तेचंद जनरल स्टेशनरी, अब्दुल खुर्शीद तहरिक प्लास्टिक, राम ट्रेडिंग कंपनी, राधे एन्टरप्राईजेस तर बर्तन ओळी इतवारी येथील आशिष घाटोळे यांच्या रांगोळी दुकानाला सील ठोकण्यात आले. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.
लक्ष्मीनगर विभागांतर्गत दोन प्रतिष्ठानांची तपासणी करून २५ हजार, धरमपेठ विभागांतर्गत चार प्रतिष्ठानांची तपासणी करून ५ हजार, धंतोलीच्या पथकाने १० प्रतिष्ठानांची तपासणी करून १८ हजाराचा दंड वसूल केला. नेहरूनगर येथे आठ प्रतिष्ठानांची तपासणी करून ५ हजार, गांधीबाग येथे पाच प्रतिष्ठानांची तपासणी करून १५ हजार, सतरंजीपुरा येथे चार प्रतिष्ठानांची तपासणी करून १५ हजार रुपये, लकडगंज येथे सात प्रतिष्ठानांची तपासणी करून १६ हजार रुपये, आसीनगर पथकाने १३ प्रतिष्ठानांची तपासणी करून १५ हजार रुपये तर मंगळवारी विभागामधील चार प्रतिष्ठानांची तपासणी करून २५ हजार रुपयाचा दंड आकारण्यात आला. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय शोध पथकांद्वारे ही कारवाई केली जात आहे.