मुख्यमंत्री कार्यालय, गृहराज्यमंत्रालय, पोलीस महासंचालनालयाकडून या प्रकरणाच्या चौकशीच्या अहवालाची सारखी मागणी होऊ लागली. त्यामुळे शुक्रवारी दुपारपासून तपासाला वेग आला. एवढे खतरनाक कैदी कारागृहातून पळाले, त्यावेळी बरॅक क्रमांक ६ च्या आजूबाजूला कुणाची ड्युटी होती. त्याची चौकशी केल्यानंतर उपरोक्त पाच कर्मचाऱ्यांची नावे सर्वप्रथम पुढे आली. या कर्मचाऱ्यांना घटनेबाबत वरिष्ठांकडून विचारणा करण्यात आली असता प्रत्येकाने विसंगत माहिती दिल्याचे समजते. ते लपवाछपवी करीत असल्याचे तसेच ‘फिक्सिंग‘मध्ये त्यांचा सहभाग असल्याचा संशय बळावल्यामुळे या पाच कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर, कारवाईची कागदोपत्री औपचारिकता पूर्ण केल्यानंतर कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप ठेवून उपरोक्त कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. अतिरिक्त पोलीस महासंचालक (कारागृह) मीरा बोरवणकर यांनी लोकमतशी बोलताना उपरोक्त कर्मचाऱ्यांच्या निलंबनाच्या वृत्ताला दुजोरा दिला. (प्रतिनिधी)
पाच शिपाई निलंबित
By admin | Published: April 05, 2015 2:24 AM