लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या परिवहन विभागाच्या आपली बसच्या ताफ्यात इलेक्ट्रिकवर संचालित पाच ‘तेजस्विनी बस ’दाखल झाल्या आहेत. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने या बसमधील चालक, वाहक व बस आगारातील कर्मचारीही महिलाच राहणार आहेत.आठवडाभरात या बसचे लोकार्पण होणार आहे.महिलांसाठी विशेष तेजस्विनी बस सुरू करण्यासाठी राज्य सरकारने २०१७ मध्ये महापालिकेला ९.२५ कोटींचा निधी दिला होता. सुरुवातीला डिझेलवर धावणाऱ्या बस चालविण्याचा मानस होता. मात्र पर्यावरणपूरक बससेवा असावी, यासाठी परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे यांनी इलेक्ट्रिकवरील बस चालविण्याचा निर्णय घेतला. परिवहन समितीच्या मंजुरीनंतर याबाबतच्या निविदा काढण्यात आल्या. ‘ओलेक्स’ या कंपनीची एकमेव निविदा आली. तीनदा निविदा काढूनही एकच दावेदार असल्याने या कंपनीची निविदा मंजूर करण्यात आली.१.४९ कोटींची एक बस असून पाच बसवर ७.४५ कोटींचा खर्च करण्यात आला आहे. ओलेक्स कंपनीकडे दहा वर्षासाठी या बसच्या देखभाल व संचालनाची जबाबदारी देण्यात आली आहे. यासाठी प्रति किलोमीटर ४२.५० रुपयेनुसार महापालिका खर्च देणार आहे. डिझेल बसच्या तुलनेत इलेक्ट्रिक बसचा खर्च कमी येणार असल्याने आर्थिक बचतच होणार असल्याची माहिती बंटी कुकडे यांनी दिली.इलेक्ट्रिक बससाठी हरिहर मंदिर येथे चार्जिंग सेंटर उभारण्यात आले आहे. प्रति युनिट १२ रुपये वीज दर गृहित धरला तरी डिझेल बसच्या तुलनेत खर्च कमी येणार आहे. सोबतच पर्यावरणाला कोणत्याही स्वरुपाची बाधा होणार नाही.तेजस्विनीचे मार्ग निश्चित करणारकुटुंबातील मुलीच्या हस्ते आठवडाभरात तेजस्विनी बसचे उद्घाटन करण्यात येणार आहे. इलेक्ट्रिकवरील तेजस्विनी बससाठी लकडगंज येथे बस आगार तयार करण्यात येत असून या आगारालाही मातृशक्ती बस आगार नाव देण्यात आले आहे.या बसचे मार्ग निश्चित केले जात आहे. महिलांना अधिकाधिक लाभ होईल अशा मार्गावर या बसेस धावणार असल्याचे कुकडे यांनी सांगितले.
नागपुरात आपली बसच्या ताफ्यात पाच तेजस्विनी बस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 7:53 PM
महापालिकेच्या परिवहन विभागाच्या आपली बसच्या ताफ्यात इलेक्ट्रिकवर संचालित पाच ‘तेजस्विनी बस ’दाखल झाल्या आहेत. आठवडाभरात या बसचे लोकार्पण होणार आहे.
ठळक मुद्देआठवडाभरात लोकार्पण : परिवहन विभागाच्या खर्चात बचत