नागपूर : फटाक्यांमुळे देशात दरवर्षी सुमारे पाच हजारांवर लोकांची दृष्टी जाते. डोळ्यांना इजा करणाऱ्या फटाक्यांमध्ये भुईनळा ६० टक्के, सुतळी बॉम्ब ३० टक्के, चक्री आणि रॉकेट १० टक्के व इतर फटाक्यांत १० टक्के प्रमाण आहे, अशी माहिती मेडिकलच्या नेत्ररोग विभागाचे विभाग प्रमुख डॉ. अशोक मदान यांनी दिली.
फटाक्यांमुळे येणाऱ्या अंधत्वाचे प्रमाण जागतिक पातळीवर पाच लाख आहे. फटाक्यात चारकोल, गंधक, नायट्रेट, क्लोरेट, परफ्लोरेट आदी घटक असतात. या घटकांचा निर्जीव आणि जीवित दोघांवरही दुष्परिणाम होतो. फटाक्यांचा धूर डोळे, फुफ्फुस व त्वचेला अपाय करतो. दमा व अॅलर्जीचे प्रमाण वाढते, असे ते म्हणाले.
अशी घ्या दक्षताफटाक्यापासून सुरक्षित अंतरावर उभे राहावेमोठ्यांच्या देखरेखीखाली फटाके फोडावेतशक्यतो मोकळ्या जागेतच फटाके फोडावेत.फटाके फोडताना शक्यतो सुती कपडे घालावे.
फोडणाऱ्यांपेक्षा बघणाऱ्यांना धोका
फटाके फोडणाऱ्यांपेक्षा बघणाऱ्यांना अधिक धोका असतो. कारण स्फोटामुळे दगड, माती वेगाने उडते व डोळ्याला व इतर अवयवांना इजा होऊ शकते. फटाक्याची जळती ठिणगी किंवा घटक गेल्यास डोळा कायमचा निकामी होण्याची शक्यता असते. दृष्टिहीनता, अंधत्व येते.
दुष्परिणामांची लक्षणे
डोळा लाल होणे, पाणी जाणे, डोळा दुखणे, अचानक डोळ्याची नजर कमी होणे, उजेड सहन न होणे, डोके दुखणे, डोळ्यात चिपड येणे, डोळे सुजणे, उलटी होणे.