नागपूर ः देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना नागपूर जिल्ह्याच्या विकासासाठी पाच हजार कोटींचे महत्वाकांक्षी प्रकल्प मंजूर केले. मात्र, मागील अडीच वर्षांमध्ये महाविकास आघाडी सरकारने हे सर्व प्रकल्प रोखल्याचे पाप केल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. विशेष म्हणजे, नागपूरकरांची तहान भागविण्यासाठी सुमारे दोन हजार ७०० कोटींच्या योजनेसह अनेक प्रकल्पांचा समावेश होता.
रखडलेल्या या प्रकल्पांना जलदगतीने मार्गी लावण्यासाठी आज बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीत प्रकल्पांची सद्यस्थिती पुढे आली. नागपूरकरांसाठी जीवाभावाच्या ठरणाऱ्या या प्रकल्पांना महविकास आघाडी सरकारने वाटाण्याच्या अक्षता कशा लावल्या, त्याचा पाढाच आज वाचण्यात आला.
प्रसारमाध्यमाशी बोलताना बावनकुळे म्हणाले , 'नागपूर शहर आणि जिल्ह्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारने पाच हजार कोटींच्या विकासात्मक योजना मंजूर करण्यात केल्या. दीक्षाभूमीसाठी शंभर कोटींची तरतूद, ताजबाग आणि कोराडीच्या महालक्ष्मी देवस्थानासाठी करण्यात आलेल्या योजनांसह विविध विकासकामांमध्ये महाविकास आघाडीने खोडा घातला. महपालिकेचे ९०० कोटी रुपये रोखले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीचा अडीचशे कोटीचा प्रस्ताव रोखला. टाऊन हाॅलचा प्रस्ताव रोखला. अनेक तलावाचे प्रस्ताव थांबवले. इतकेच नव्हे तर, मध्यप्रदेशातील घोगरी ते तोतलाडोह ही 62 किलोमीटरचा मंजूर बोगदाही सरकारने रखडविला. ही सर्व कामे पुन्हा मार्गी लावण्यासाठी बैठक घेण्यात आली. येत्या नागपूर अधिवेशनात ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कामांना मंजुरी द्यावी, यासाठी प्रयत्न करणार आहे. पालकमंत्री नसल्याने काम थांबण्याचा प्रश्नच नाही. ज्या कामांना मंजुरी मिळाली, ते कामे महाविकास आघाडी सरकारने थांबवली होती,असेही बावनकुळे यांनी सांगितले
पंकजा मुंडे यांच्या रक्तात भाजपपंकजा मुंडे या राष्ट्रीय नेत्या असून त्यांच्या रक्तात भाजप आहे. त्या भाजपशिवाय अन्य विचारही करू शकत नाही. त्यामुळे आमदार अमोल मिटकरी जे स्वप्न बघत आहे ते पूर्ण होणार नाही. मिटकरींनी त्यांच्या पक्षात काय घडणार आहे हे प्रथम पाहावे असेही बावनकुळे म्हणाले.