नागपूर : काटोल तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरासमोर खेळत असलेल्या ५ वर्षीय चिमुकल्यावर भटक्या श्वानांच्या कळपाने हल्ला चढविला. या मोकाट श्वानांनी त्याच्या शरीराच्या विविध भागांचे अक्षरश: लचके तोडले. या घटनेत चिमुकल्याचा मृत्यू झाला. घटना आज(दि. ११) सकाळी ६ च्या सुमारास घडली.
विराज जयवार हा चिमुकला आज सकाळी घराबाहेर खेळत असताना भटक्या श्वानांनी त्याच्यावर हल्ला केला. घाबरलेला विराज जीवाच्या आकांताने ओरडू लागला, त्याचा आवाज ऐकताच घरचे पळत बाहेर आले तेव्हा, त्यांना भटके श्वान विराजवर हल्ला करत त्याचे लचके तोडताना दिसले. दरम्यान, वस्तीतील इतर नागरिकांनीही धाव घेतली. त्यांनी विराजला श्वानांच्या तावडीतून सोडवत रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात नेले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले. विराजच्या मृत्यूने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
भटक्या श्वानांच्या हल्ल्याची ही पहिलीच घटना नाही, याआधीही अशा घटना घडल्या असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी भटक्या श्वानांचा तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी लावून धरली होती. या श्वानांचा वेळीच बंदोबस्त केला असता तर चिमुकल्या विराज आज जीवंत असता, अशी प्रतिक्रिया देत आता तरी प्रशासनाला जाग येणार का, असा सवालही नागरिकांनी उपस्थित केला आहे.