राकेश घानोडेनागपूर : कुऱ्हाडीने हल्ला करून शेजाऱ्याला ठार मारणाऱ्या आरोपीस मंगळवारी सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यांतर्गत दोषी ठरवून पाच वर्षे सश्रम कारावास व २५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावण्यात आली. सत्र न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश एस. बी. अग्रवाल यांनी हा निर्णय दिला.
सूरज विलास बागडे (२९) असे आरोपीचे नाव असून तो न्यू नेहरूनगर येथील रहिवासी आहे. मृताचे नाव देवदर्शन ऊर्फ बाळू मेश्राम (४५) होते. ते शंकरपूर येथे पोल्ट्री फार्म चालवित होते. आरोपी त्यांच्या घरामागे एकटाच राहत होता. घटनेपासून तीन वर्षांपूर्वी मेश्राम यांनी घराचे काम काढले होते. दरम्यान, त्यांनी आरोपीच्या घरापुढे टिनाचे पत्रे ठेवले होते. त्यामुळे आरोपीने त्यांना शिविगाळ केली होती. करिता, मेश्राम यांनी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. तेव्हापासून आरोपी मनात राग धरून होता.
९ ऑक्टोबर २०२१ रोजी दुपारी ४ च्या सुमारास मेश्राम व आरोपीचे संजय गांधी चौकात भांडण झाले. दरम्यान, आरोपीने मेश्राम यांना शिविगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर रात्री ९.३० च्या सुमारास मेश्राम घरी आले व आरोपीला समजावण्यासाठी त्याच्या घरी गेले. त्यावेळी पुन्हा त्यांचे भांडण झाले व आरोपीने कुऱ्हाड उचलून मेश्राम यांच्या डोक्यावर वार केला. त्यानंतर मेश्राम यांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. न्यायालयात सरकारच्या वतीने ॲड. आसावरी परसोडकर यांनी कामकाज पाहिले. आरोपी १६ ऑक्टोबर २०२१ पासून कारागृहात आहे.