लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जीएसटी काळाची गरज असून त्याचा सकारात्मक परिणाम पुढे दिसून येणार असून, देशाचा आर्थिक विकास वेगाने होणार आहे. नवीन करप्रणाली आणि त्याची अंमलबजावणी प्रारंभी कोणत्याही सरकारसमोर एक आव्हानच असते. पण केंद्रातील स्थिर सरकारमुळे कर सुधारणा निश्चितच होणार असल्याचे मत माजी खासदार अजय संचेती यांनी येथे केले.इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडियाच्या नागपूर शाखेतर्फे शनिवारी जीएसटीवर आयोजित विभागीय कर परिषदेत मुख्य अतिथी म्हणून संचेती बोलत होते. याप्रसंगी आयसीएआयच्या पश्चिम विभागीय कौन्सिलचे (डब्ल्यूआयआरसी) उपाध्यक्ष सीए उमेश शर्मा आणि कोषाध्यक्ष सीए यशवंत केसर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.संचेती म्हणाले, जीएसटीमधील क्लिष्ट तरतुदी पुढे काढून टाकण्यात आल्या आहेत. याशिवाय करटप्पेसुद्धा कमी करण्यात आले आहेत. पुढे काही वर्षातच होणाऱ्या जीएसटीमधील कर सुधारणा आणि सुसूत्रीकरण स्टेकहोल्डर्सला फायद्याच्या ठरणार आहेत. याकरिता काही वेळ निश्चित लागेल. एवढेच नव्हे तर राज्याचे वित्तमंत्री आणि आयसीएआयच्या सदस्यांनी कायद्यात दुरुस्ती व करसंदर्भात केलेल्या सूचना अमलात आणल्या आहेत. त्या सीएंना फायद्याच्या ठरत आहेत.डब्ल्यूआरसीने जीएसटी वार्षिक रिटर्न आणि जीएसटी ऑडिटवर प्रकाशित केलेले पुस्तक नागपूर ब्रँचने जारी केल्याबद्दल सीए उमेश शर्मा यांनी अभिनंदन केले. सीए यशवंत केसर म्हणाले, सरकार असो वा व्यावसायिक सर्वांसाठी आव्हानात्मक काळ आहे. पुढील काळात पेपरलेस होण्यासाठी ई-लर्निंग फायद्याचे ठरणार आहे. सीएंनी आयटी टुल्सचा जास्तीत जास्त उपयोग करावा.आयसीएआयच्या नागपूर शाखेचे अध्यक्ष सीए सुरेन दुरगकर म्हणाले, शाखेची माहिती देताना मुंबईचे वक्ते सीए केवल शाह, सीए जिग्नेश कानसरा आणि सीए नरेश सेठ यांचे स्वागत केले. परिषदेच्या आयोजनासाठी डब्ल्यूआयआरसीच्या अध्यक्षा सीए प्रीती सावला यांचे आभार मानले. विभागीय कौन्सिल सदस्य सीए अभिजित केळकर यांनी मार्गदर्शन केले.परिषदेत नागपूर शाखेचे कोषाध्यक्ष सीए जितेन सागलानी, कार्यकारी समिती सदस्य सीए हरीश रंगवानी, सीए अक्षय गुल्हाने, सीए कीर्ती कल्याणी, सीए साकेत बागडिया, सीए संजय अग्रवाल, आयसीएआयचे माजी अध्यक्ष जयदीप शाह, सीए जुल्फेश शाह, सीए उमंग अग्रवाल आणि विदर्भातील ४०० पेक्षा जास्त सीए उपस्थित होते.