नरेश डोंगरे नागपूरराज्याच्या सुरक्षा व्यवस्थेला हादरा देणाऱ्या कैदी पलायन प्रकरणात ‘फिक्सिंग’ असल्याचा प्राथमिक अंदाज पुढे आला आहे. तपास अधिकाऱ्यांकडे कैद्यांनी दिलेल्या जबाबवजा माहितीतून ‘फिक्सिंग’ उजेडात आल्याची खास सूत्रांची माहिती आहे. अतिरिक्त पोलीस महासंचालक (कारागृह) मीरा बोरवणकर यांच्याकडे यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी ‘फिक्सिंग’बाबत थेट बोलण्याचे टाळले. आजच याबाबत काही बोलता येणार नसल्याचे सांगून, उद्या सायंकाळपर्यंत आपण काही निष्कर्ष काढू, असेही सांगितले. मंगळवारी पहाटे २ ते ४ च्या सुमारास बडी गोलमधील बराक क्रमांक ६ च्या खिडकीचे लोखंडी गज कापून बिशेनसिंग रम्मूलाल उके (रा. धुमाळ, जि. शिवनी, मध्य प्रदेश), शिबू ऊर्फ मोहम्मद शोएब सलीम खान ( रा. मानकापूर), सत्येंद्र ऊर्फ राहुल राजबहादूर गुप्ता (रा. कामठी, नागपूर), प्रेम ऊर्फ नेपाली शालिकराम खत्री (रा. नेपाळ) आणि गोलू ऊर्फ आकाश रज्जूसिंग ठाकूर (रा. नागपूर) हे पाच खतरनाक कैदी पळून गेले होते. राज्यातील सर्वाधिक सुरक्षित अन् आयएसओ प्रमाणपत्र प्राप्त अशा या कारागृहात ही घटना घडल्यामुळे अवघ्या राज्यातीलच कारागृहाची सुरक्षा तसेच आतमधील कारभार सर्वत्र चर्चेला आला आहे. या घटनेची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून, राज्याच्या कारागृह प्रशासन प्रमुख, अतिरिक्त पोलीस महासंचालक मीरा बोरवणकर खुद्द बुधवारी सकाळी नागपुरात पोहोचल्या. याशिवाय स्थानिक पोलीस अधिकारी आणि पुणे तसेच बुलडाणा येथील तपास पथकही या खळबळजनक प्रकरणाची चौकशी करीत आहेत. मंगळवारी दुपारी पत्रकारांशी बोलताना कारागृह उपमहानिरीक्षक शशिकांत शिंदे यांनी ‘ते’ पाच कैदी एकमेकांच्या खांद्यावर चढून पळाल्याची माहिती मंगळवारी पत्रकारांना दिली होती. मात्र, ही माहिती साफ खोटी असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. मंगळवारपासून चौकशी करणाऱ्या सूत्रानुसार, ज्या दक्षिण भागातून कैदी पळाले, त्या भागात त्या रात्री पाच कर्मचारी परिसरात तर एक कर्मचारी मनोऱ्यावर (वॉच टॉवरवर) उभा होता. बराकीजवळ वॉर्डनही होता. रात्रभरात तीनवेळा संचारफेरी(नाईट राऊंड)ची जबाबदारी तुरुंगाधिकारी मलवाड यांच्यावर होती.
कैदी पलायनात फिक्सिंग
By admin | Published: April 02, 2015 2:21 AM