आज ८६ व्या वर्षांत प्रवेश : पीडित, वंचित उपेक्षितांसाठी दिले अवघे आयुष्य नागपूर : उत्तर प्रदेशातील यमुना किनारी असलेल्या होलीपुरा गावातून एक किशोरवयीन मुलगा नागपूरला निघाला होता पुढच्या शिक्षणासाठी. वाटेत एका स्टेशनवर गाडी थांबली तेव्हा पाणपोईवर वो हिंदू का पाणी, वो मुसलमान का पाणी, असे शब्द त्याने ऐकले आणि ते शब्द त्याच्या काना-मनावर आदळत राहिले एखाद्या ज्वालारसाप्रमाणे. देवाने पाण्याची निर्मिती करताना कुठलाच भेदभाव केला नाही, मग माणसं हा भेद का जपताहेत? नाही... हे चित्र बदलले पाहिजे, असा ध्यास त्याने चालत्या गाडीतच घेतला आणि नागपुरात पाय ठेवल्यावर त्याच दिशेने चालण्याचा संकल्पही करून टाकला. आज त्या अखंड प्रवासाला ८५ वर्षे होत आहेत आणि तेव्हाच्या त्या किशोरवयीन मुलाचे आजचे नाव आहे उमेशबाबू चौबे. पीडित, वंचित उपेक्षितांसाठी अवघे आयुष्य वेचणाऱ्या उमेशबाबूंना नागपुरात सगळेच आदराने बाबूजी म्हणतात. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राम मनोहर लोहिया यांना आपल्या आयुष्यात प्रत्यक्ष पाहिलेले व त्यांच्या विचारांना आपला आदर्श मानणारे बाबूजी अवघे आयुष्य एखाद्या औलियासारखे जगले. पत्रकार, छायाचित्रकार, समाजसेवक, नाटककार, राजकारणी अशा विविध भूमिकांमध्ये नागपूरवासीयांनी बाबूजींना पाहिले असले तरी त्यांची खरी ओळख एका नि:स्वार्थ समाजसेवकाची आहे. आॅटोचालक, रिक्षाचालक, रेल्वे हमाल, फुटपाथ दुकानदार, माथाडी कामगार, मिल मजूर यांच्या हक्कासाठी वेळोवेळी आंदोलनाची मूठ बांधून त्या आंदोलनाच्या बळावर अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्याचे कार्य बाबूजींनी केले. त्यासाठी प्रसंगी घरावर तुळशीपत्र ठेवले. केवळ कष्टकरी, मजुरांसाठीच संघटना बांधून ते थांबले नाहीत तर विदर्भातील कलावंतांना सन्मानाचे व्यासपीठ मिळावे, यासाठी ३० वर्षांआधी त्यांनी स्वत: पुढाकार घेऊन कलासागर या संस्थेची स्थापना केली. तत्कालीन नागपूर विद्यापीठात अधिकृत विद्यार्थी संघटनेचे पहिले अध्यक्ष बनून विद्यार्थ्यांसाठी लढा दिला. नगरसेवक म्हणून मनपात प्रवेश केल्यावर अभ्यासपूर्ण पद्धतीने तेथील भ्रष्टाचार चव्हाट्यावर मांडला. धर्मातील दांभिकतेवर बोलताना एका कथित साधूने हल्ला केल्यानंतरही बाबूजी डगमगले नाहीत. उलट त्यांनी अशा भोंदूबाबांचा खरा चेहरा समाजासमोर आणण्यासाठी श्याम मानवांच्या नेतृत्वात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची नवी आघाडी उघडली. बाबूजींमुळेच नागपूरच्या शंभर शहिदांचे स्मारक झिरो माईलजवळ उभारले गेले. अशा समाजाला विधायक दिशा देणाऱ्या अजातशत्रू व्यक्तिमत्त्वाला दीर्घायुष्य लाभो हीच कामना...(प्रतिनिधी) अन् रस्ताच काढला विकायला बाबूजींची काम करण्याची पद्धत वेगळी होती. या वेगळेपणाचा एक किस्सा फार प्रसिद्ध आहे. बाबूजी नगरसेवक असताना एसटी स्टॅण्डपासून सुभाष रोडपर्यंत रस्त्यावर खूप खड्डे होते बाबूजींनी मनपाला पत्र लिहिले. मनपाचे उलट टपाली उत्तर आले की हा रस्ता आमच्या अधिकार क्षेत्रात येत नाही. मग बाबूजींनी नासुप्रला पत्र लिहिले. त्यांचे उत्तर तेच होते. या सरकारी उपेक्षेने संतापलेल्या बाबूजींनी मग आग्याराम देवी चौकात फलक लावला...ज्यावर लिहिले होते ‘सुभाष रोड ते नाग नदीकडे जाणाऱ्या मार्गावरील प्लॉट विकणे आहे’, हे फलक पाहून मनपा हादरली. दुसऱ्याच दिवशी त्यांचा अभियंता बाबूजींच्या घरी आला, माफी मागितली व रस्ता दुरुस्त झाला. असा हा कफल्लक माणूस आजही वयाच्या ८५ व्या वर्षी कार्यकर्त्यांच्या स्कूटरवर बसून निघत असतो नव्या सामाजिक लढाईसाठी. ही लढाई लढताना अशा कुठल्या कामासाठी सरकारदरबारी पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण दिले जाते, हे बाबूजींच्या गावीही नसते.
नांदेड येथे पाकचा ध्वज जाळला
By admin | Published: April 17, 2017 2:45 AM