लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यातील सावनेर, कळमेश्वर आणि मौदा या तीन तालुक्यात राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत नाविन्यपूर्ण कुक्कुट उत्पादकता कार्यक्रमाद्वारे कुक्कुट व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी मांसल कुक्कुट पक्षी वाटप योजना राबविण्यात येणार आहे. इच्छुक व्यक्ती व संस्थांनी १ ते १० जुलैपर्यंत जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांकडे अर्ज सादर करावे, असे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी कळविले आहे.
कळमेश्वर तालुक्यातील नंदीखेडा, मोहगाव, कोहळी, बुधला, सुसुंद्री, तिष्टी, घोगली, लोहगड व गोंडखैरी तर सावनेर तालुक्यातील खुबाळा, कोच्छी, बडेगाव, भेंडाळा, केळवद, पाटणसावंगी, गुमगाव, नांदागोमुख, वाकोडी या तालुकानिहाय प्रत्येकी नऊ गावाची तसेच मौदा तालुक्यातील दहेगाव, धांदला व भोवरी या तीन गावांची अशी एकूण २१ गावांची निवड जिल्ह्यात करण्यात आली.
योजनेंतर्गत प्रती लाभार्थी ६०० मांसल जातीचे कुक्कुट पक्षी (ब्रायलर) याप्रमाणे २०० लाभार्थ्यांना वाटप करावयाचे आहे. प्रत्येक लाभार्थ्याला १५० एक दिवसीय मांसल पिल्ले दर ३ महिन्यांच्या अंतराने लागणाऱ्या खाद्यासह पुरवठा करण्यात येणार आहे. पक्षी सहा आठवड्याचे झाल्यावर एकाच वेळी विक्री करण्यासाठी लाभार्थ्यांकडून उचल करावयाची आहे.
इच्छुक व्यक्ती व संस्थांनी १० जुलैपर्यंत अर्ज सादर करून कार्यालयाच्या तांत्रिक शाखेची पोच घ्यावी. इतरत्र दिलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.