नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी सकाळी गो फर्स्टच्या विमानातील प्रवाशांनी विमानाला उशीर झाल्याने जोरदार गोंधळ घातला. प्रवाशांचा संताप पाहून गो फर्स्टच्या कर्मचाऱ्यांनी एअरलाइन्सच्या काउंटरमध्ये स्वत:ला बंद करून घेतले.
गो फर्स्टचे विमान जी-८-२८२ नागपूर-पुणे आपल्या ठरावीक वेळेत पहाटे ५:४५ वाजता उड्डाण भरू शकले नाही. या विमानातून प्रवास करण्यासाठी १८० प्रवासी पहाटे ४ वाजेपासूनच विमानतळावर पोहोचले होते. सकाळी ६ ते ७ वाजेपर्यंत प्रवाशांचा संताप वाढू लागला आणि त्यानंतर प्रवाशांनी एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांना सुनावण्यास सुरुवात केली. प्रवाशांच्या संतापामुळे येथील परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. तब्बल ४.३० तासांच्या उशिरानंतर विमान पुण्यासाठी रवाना झाले.
सूत्रानुसार १८० प्रवाशांपैकी केवळ ८० प्रवाशांनीच या विमानाने प्रवास केला. उर्वरित १०० प्रवाशांनी प्रवासच रद्द केला. असेही सांगितले जाते की, या विमानातील प्रवाशांचा संताप शांत होण्यापूर्वीच दुसरे विमान जी-८-१४१ नागपूर-मुंबईचे प्रवासीसुद्धा सकाळी ९ वाजता विमानतळावर पोहोचले होते. त्यांना विमान रद्द करण्यात आल्याची माहिती मिळताच तेही संतापले. अशा परिस्थितीत विमानातील कर्मचारी काउंटरच्या बाहेर पडलेच नाही.