नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यानुसार एखादा प्रवासी विदेशातून प्रवास करून आलेला असल्यास त्यास होम क्वारंटाईन करण्यात येत आहे.
विदेशातून येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटाईन केल्यानंतर त्याची सूचना महापालिकेला देण्यात येत आहे. याशिवाय सेल्फ डिक्लेरेशन फॉर्मही प्रवाशांकडून भरून घेण्यात येत आहे. नागरी उड्डयन महासंचालनालयाच्या वतीने (डीजीसीए) जारी केलेल्या यादीतील राज्यातून प्रवासी आरटीपीसीआर टेस्ट न करता विमानतळावर पोहोचला असेल तर विमानतळावर त्याची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येत आहे. मिहान इंडिया लिमिटेडचे (एमआयएल) कर्मचारी कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी खबरदारी घेत आहेत. प्रवासी एकमेकांजवळ उभे राहिल्यास आणि त्यांनी योग्यरीत्या मास्क घातले नसल्यास त्यांना सुरक्षित अंतर राखण्याचा सल्ला देऊन योग्यरीत्या मास्क घालण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. सोमवारी लॉकडाऊन असल्यानंतरही विमानसेवेवर त्याचा परिणाम पडला नाही. जाणकारांच्या मते, पूर्वी सहा महिन्यांच्या लॉकडाऊनमध्ये विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोरोनाचे नियम पाळण्याची सवय पडली आहे. त्यामुळे नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांची सुरळीत वाहतूक सुरू होती.
............