नागपूर : गेल्या आठवडाभरापासून विदर्भात सर्वत्र संततधार पावसामुळे दयनीय स्थिती झालेली आहे. नदी-नाले दुथडी वाहत असून पुराचे पाणी अनेक गावांत शिरले आहे. गडचिराेली जिल्ह्याला याचा सर्वाधिक फटका बसला असून ४० गावांना पुराचा वेढा पडला आहे. वर्धा जिल्ह्यातील २५ तर चंद्रपूर जिल्ह्यातील १२ गावांमध्ये पुराचे पाणी शिरले असून स्थिती नाजूक आहे. अनेक घरांची पडझड झाली आहे. चिमूर उपजिल्हा रुग्णालयाच्या मागील बाजूला असलेली एक झोपडी बुडाल्याने त्यात बांधून असलेल्या पाच जनावरांचा मृत्यू झाला. चंद्रपूर जिल्ह्याला जाेडणारे बहुतांश मार्ग बंद झालेले आहेत. भंडारा आणि यवतमाळमध्ये नाल्याच्या पुरात विद्यार्थी वाहून गेल्याची घटना घडली. साेबतच नागपूर जिल्ह्यात दाेन वेगवेगळ्या ठिकाणी दाेघे वाहून गेले. त्यातील एकाचा मृतदेह गवसला. त्यासाेबतच जांब (ता. कारंजा, जि. वाशिम) येथील मातीच्या घराची भिंत कोसळून त्यामध्ये एका बालकाचा मृत्यू, तर तीन जण गंभीर जखमी झाले.
चंद्रपूर जिल्ह्यातील चिचाळा (ता. मूल) येथे घराची भिंत कोसळून त्याखाली दबून चार शेळ्यांचा मृत्यू झाला, तर १० शेळ्या जखमी झाल्याची घटना घडली. २४ तासांत सावली तालुक्यात सर्वाधिक १४० व चिमूर तालुक्यात १२५ मि.मी. पाऊस कोसळला. खातोडा येथील पाच जणांना बोटीने सुखरूप बाहेर काढण्यात आले. चिमूर-भिसी-नागपूर हा महामार्गासह खडसंगी- भानसुली, खडसंगी-मूरपार, चिमूर-पळसगाव, सिंदेवाही-वासेरा, रत्नापूर-खांडला सरांडी, मूल ते चामाेर्शी व वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे वरोरा ते वणी मार्गही बंद पडला.
भंडारा जिल्ह्यात गत पाच दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून गत २४ तासात ६१.२ मिमी पाऊस कोसळला. १० मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. पवनी तालुक्यातील आसगाव येथे शिकवणी वर्गासाठी जाणारा १० वर्षीय विद्यार्थी नाल्याच्या पुरात वाहून गेल्याची घटना सोमवारी सकाळी ९.३० वाजता घडली. नदी-नाल्यांना पूर आला असून अड्याळ-विरली, सोनेगाव ते विरली आणि भावड ते तेलोदा या मार्गावरील पुलावर पाणी असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.
गोंदिया जिल्ह्यात मागील तीन चार दिवसांपासून पावसाचा जोर कायम असल्याने नदी नाले दुथडी भरुन वाहत आहे. जिल्ह्यात २४ तासांत ३०.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात १५० हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे २५० वर घर आणि गोठ्यांची पडझड झाली.
गडचिरोली जिल्ह्यात सोमवारी सकाळी घेतलेल्या नोंदीनुसार २४ तासांत जिल्हाभरात सरासरी १०७.८ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली. जिल्ह्यातील १२ पैकी ११ तालुक्यांमध्ये अतिवष्टी झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत ६ लोकांचा बळी गेला आहे. तर अनेक जनावरेही दगावली आहेत. कच्च्या घरांचीही पडझड झाली आहे. त्याच्या सर्वेक्षणाचे काम प्रशासनाकडून सुरू आहे.
भंडारा, गडचिरोलीतील शाळांना ३ दिवस सुटी
पावसामुळे नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. त्यातच हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. परिणामी गडचिराेली आणि भंडारा जिल्ह्यांतील शाळांना २० जुलैपर्यंत सुटी देण्यात आली आहे. गडचिराेलीत मागील आठवड्यात सुरुवातीला ३ दिवस, त्यानंतर ३ दिवस अशी आठवडाभर सुटी जाहीर करण्यात आली हाेती. त्यास पुन्हा मुदतवाढ देण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. यासाेबतच गडचिराेली जिल्ह्यातील खासगी आस्थापना बंद ठेवण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. वाशिममध्ये जिल्ह्यातील शाळा १८ जुलै आणि १९ जुलै हे दोन दिवस बंद ठेवण्याबाबतचे निर्देश जिल्हा परिषदेच्या माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षण विभागाला देण्यात आले आहेत.