लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नाल्यांवर करण्यात आलेल्या अतिक्रमणांमुळे घोगली, बेसा, बेलतरोडी, हुडकेश्वर या परिसरात पूरपरिस्थिती निर्माण झाल्याचे पाहणीत स्पष्ट झाले आहे. अतिक्रमणांमुळे पाणी तुंबले आणि वस्त्यांमध्ये घुसले तर कुठे पाण्याने पूल वाहून नेले आहेत. संबंधित नाले ताब्यात घेऊन त्यावरील अतिक्रमण हटविण्याचे आदेश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. सोबतच संबंधित परिसराचे सर्वेक्षण करून आपद्ग्रस्तांना शासकीय मदत दिली जाणार आहे.शुक्रवारी जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. रस्त्यांवर पाणी तुंबले. वस्त्यांमध्ये पाणी शिरले. शहराच्या बाह्य भागात परिस्थिती आणखीनच चिंताजनक होती. शनिवारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पूरग्रस्त भागाचा भागाचा दौरा केला. पाहणी दौऱ्यात नाल्यांवर अतिक्रमण केल्याचे आढळून आले. याची दखल घेत सर्व अतिक्रमण १५ दिवसात काढा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. ज्या संस्थांनी अतिक्रमण केले आहे त्यांना नोटीस देणे व त्यांचेही अतिक्रमण हटविण्याची सूचना पालकमंत्र्यांनी प्रशासनाला केली.घोगली येथे पुलावरून पाणी जाऊन वस्त्यांमध्ये लोकांच्या घरात शिरले. वैद्य प्लायवूड या कंपनीने येथील मूळ नाला वळवून नाल्याच्या भागावर बांधकाम केल्याचे आढळले. या प्रकरणी न्यायालयाने जैसे थे स्थिती कायम ठेवायला सांगितली असली तरी शासनातर्फे न्यायालयाला वस्तुस्थिती सांगितली जाईल, असेही पालकमंत्री म्हणाले.पोहरा या नाल्यावर अनेकांनी अतिक्रमण केल्याचे आढळून आले. नागपूर शहराजवळ शिवनी या कामठी तालुक्यातील गावात नाग नदी आणि नाल्याचे पाणी एकत्र आल्यामुळे महापुरासारखी स्थिती निर्माण झाली होती. संपूर्ण गावात पाणी घुसल्याचे दिसत होते. गंभीर पूरस्थिती निर्माण करणाऱ्या नाल्यांचे रुंदीकरण आणि खोलीकरण प्रशासनाने करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.टेकआॅफ सिटीला नोटीस अनेक बिल्डरांनी आपल्या घरबांधणी योजना करताना नाल्यांच्या जागा आपल्या ताब्यात घेतल्यामुळे नाले लहान झाले व पाणी मोकळेपणे जाऊ शकले नाही. परिणामी अनेक वस्त्या पाण्यात बुडण्याशिवाय पर्याय नव्हता असेही निदर्शनास आले. गोन्ही सिम श्रीरामनगर येथे काही नागरिकांनी घरेच नाल्यात बांधली आहेत. तर टेकआॅफ सिटी या योजनेत बिल्डरने नाल्याचा मोठा भाग आपल्या ताब्यात घेऊन कंपाऊंड वॉल उभारली आहे. याची दखल घेत टेकआॅफ सिटीला नोटीस देण्याचे निर्देस पालकमंत्र्यांनी दिले.नाल्याची जागा घेणाऱ्या दोन्ही शाळांवर कारवाई