अभय लांजेवार
नागपूर : आपल्या घराच्या अवतीभवती पाणी वाढू शकते. घरातही पाणी शिरणार. धोका संभवू शकतो, असा अंदाज बांधून त्यांनी रात्री २ वाजेपर्यंत जागरण केले. घड्याळाचे काटे पुढे सरकत होते आणि जीव टांगणीला अडकला होता. अशातच होते नव्हते संपूर्ण महत्त्वाचे साहित्य खाटेला बांधले. अख्खी खाटच घराच्या आडोशाला बांधली. एकूण पाच कुटुंबांतील २१ जणांनी सहीसलामत बाहेर पडत आप्तस्वकीयांकडे आसरा घेतला.
गुरुवारी मध्यरात्री ते अगदी पहाटे चार वाजेपर्यंत उमरेड तालुक्यातील बेला या गावानजीकच्या सावंगी (बुजरुक) येथे हा प्रसंग घडला. जुनापाणी (नागपूर ग्रामीण) येथील तलाव फुटला. वडगाव धरणाच्या पाण्याची पातळी वाढली. प्रशासकीय यंत्रणासुद्धा जागी होती. परिस्थिती समजून घेत प्रशासनाने वडगाव धरणाच्या पाण्याचा विसर्ग काढण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे सावंगी बुजरुक येथील नाल्यालगतची पाण्याची पातळी अचानकपणे वाढली. या सावंगी नाल्यालगत चंद्रभान वाघमारे, मुरलीधर हिवंज, सुंदराबाई हिवंज, शंकर वाघमारे, नारायण जयस्वाल या पाच कुटुंबीयांची घरे आहेत. पाणी वाढत असल्याचा धोका या कुटुंबीयांनासुद्धा लक्षात आला. पाचही कुटुंबीयांनी एकमेकांना धीर देत रात्र जागून काढण्याचे ठरविले. सायंकाळपासून पाणी सभोवताली वाढत होते. तासातासाला धोका अधिकच वाढत होता. अशातच घरातील महत्त्वपूर्ण साहित्य त्यांनी खाटेला दोरखंडाने बांधण्यास सुरुवात केली. त्यानंतर संपूर्ण खाटच घराच्या आडोशाला बांधला.
पाचही कुटुंबांतील २१ जणांनी गावातील नातेवाइकांकडे पहाटे ४ ते ५ वाजताच्या सुमारास मुक्काम केला. या पाचही कुटुंबीयांच्या घरात दोन ते तीन फुटांपर्यंत पाणी शिरले. त्यांचे संपूर्ण घर चिखलमय झाले होते. अखेरीस शुक्रवारी सकाळी ९.३० वाजतापासून नाल्यातील पाणी ओसरू लागले. त्यानंतर सकाळी ११ वाजताच्या सुमारास पाचही कुटुंबीयांनी परतीची वाट धरली. तहसीलदार संदीप कुंडेकर, पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी नितेश माने यांनी पाहणी करीत कुटुंबीयांचे कौतुक केले. त्यांना धीर दिला.
जागले म्हणून वाचले
सायंकाळपासूनच सभोवताली पाण्याची पातळी हळूहळू वाढू लागल्याचे लक्षात आल्याने पाचही कुटुंबीय सतर्क झालेत. मोठ्या हिमतीने शक्कल लढवित बहुतांश साहित्य खाटेला बांधले आणि स्वत: सुरक्षित ठिकाणी पोहोचले. कदाचित ते जागले नसते आणि पाणी अधिक प्रमाणात वाढले असते तर जीवघेणा सामना करावा लागला असता.