नागपूर : पुरामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या कारसह इलेक्ट्रिक कारचेही (इव्ही) सर्वाधिक नुकसान झाले आहे. पाण्यामुळे इव्ही कारचे किती पार्ट खराब झाले आणि बॅटरी किती प्रमाणात निकामी झाल्या आहेत, याची माहिती कारच्या दुरुस्तीवेळी तज्ज्ञ मेकॅनिक्सला येणार आहे. एकीकडे नितीन गडकरी इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देत आहेत तर दुसरीकडे पुराच्या पाण्यामुळे खराब झालेल्या कारला गडकरी काय मदत करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इव्ही कार पुरात बुडण्याची पहिलीच वेळतंत्रज्ञान कितीही अद्ययावत असले तरीही पाण्यात बुडालेले इलेक्ट्रॉनिक्स पार्ट आणि बॅटरी निकामी होते. काहीच भागांची दुरुस्ती करता येते. सध्या इव्ही कारच्या दुरुस्तीची वेळ कोणत्याही डिलर्सवर आजपर्यंत आलेली नाही. त्यामुळे ते या बाबतीत अनभिज्ञ आहेत. या संदर्भात काही डिलर्सने कंपनीशी संपर्क साधला आहे. सोमवारी खरी बाब पुढे येणार असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. पाण्यात बुडालेल्या कारची दुरुस्ती कशी करायची, याची माहिती कंपनीकडे विचारण करून करण्यात येणार असल्याचे काही डिलर्सनी सांगितले. पाण्यात बुडालेल्या कारसंदर्भात तज्ज्ञांनी अनेक सूचना केल्या आहेत. पार्किंगमध्ये बुडालेली कार पाणी ओसल्यानंतरही सुरू करू नये, अन्यथा कारचे इंजिन सीझ होण्याची शक्यता असते. कार टोईंग व्हॅनच्या मदतीने बाहेर काढून वर्कशॉपमध्ये न्यावी. विमा मिळविण्यासाठी इंजिन प्रोटेक्शन विमा असणे आवश्यक आहे. ईव्ही कार संदर्भात येणारा अनुभव डिलर्सला सक्षम बनविणारा राहील, असे मत आहे.
पार्किंगमध्ये पाण्यात बुडालेल्या ३५ कार मालकांचे आतापर्यंत फोन आले आहेत. त्यात ६ ते ७ इलेक्ट्रिक कार आहेत. पार्किंगमधील पाणी पंपाने बाहेर काढल्यानंतर टोईंग व्हॅनने कार वर्कशॉपमध्ये आणण्यात येईल. विमा सर्वे आणि कंपनीच्या मान्यतेनंतर कार दुरुस्तीसाठी हाती घेतली जाईल. याकरिता कंपनीची मदत घेण्यात येणार आहे. सोमवारपासून काम सुरू होईल. पाण्यात बुडालेल्या इव्ही कार दुरुस्तीची ही पहिलीच वेळ आहे.अक्षित नांगिया, संचालक, नांगिया ऑटोमोबाईल्स.