जलालखेडा : नरखेड तालुक्यात मागील काही दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. बुधवारी आलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला. त्यामुळे नदी काठावरील शेतकऱ्यांच्या शेतात पुराचे पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जलालखेडा येथून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या भारसिंगी येथील जाम नदीच्या पुलावरून बुधवारी रात्री १२ वाजेपासून पाणी असल्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनाच्या लांब रांगा लागल्या होत्या. तसेच जलालखेडा येथून एक किलोमीटर असलेल्या खडकी येथील जाम नदीच्या पुलावरून सुद्धा रात्रीपासून पाणी वाहत होते.
तालुक्यातील मोहगाव भदाडे, गोडीमोहगाव, पांजरा (रिठी) शिवारात पाझर तलावाचा आउटलेट फुटून मोहगाव भदाडे व पिपळा (के.) येथील देवळी नदीच्या पुराचे पाणी नदी काठच्या शेतात शिरल्याने जवळपास १२५ हेक्टर मधील पिकाचे नुकसान झाले आहे. त्यात कापूस, तूर, संत्री, मोसंबी पिकांचा समावेश आहे. शेतातील पाइप व शेती उपयोगी वस्तू, गाय, वाहून गेले. तलाठी यांनी तात्काळ दखल घेऊन नुकसानीचे पंचनामे तयार करून प्राथमिक अहवाल संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठवला आहे. थंडीपवनी शिवारातील तारा, उतारा, सायावडा खलालनगोंदी या परिसरातील शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.
--
वाहतूक सुरळीत
दोन्ही पुलांवरील पाणी गुरुवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास ओसरले. पुलावरून पाणी असल्यामुळे पोलीस कर्मचारी त्या भागात तैनात करण्यात आले होते. पाणी कमी झाल्यावर पोलिसांनी दोन्ही बाजूंची वाहतूक सुरळीत केली. गेल्या काही दिवसांपासून राज्यात चांगला पाऊस सुरू आहे. बुधवारी मुसळधार पाऊस झाल्यामुळे जाम नदीला पूर आला. त्यामुळे दोन्ही पुलांवरून पाणी वाहत होते. पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे आठ तास वाहतूक खोळंबली होती.
-शेतात कपाशी व तुरीची पेरणी केली असून. मागील ६ ते ७ दिवसापासून सतत पाऊस सुरू असल्यामुळे नदीला पूर आला आहे. पुराचे पाणी शेतात शिरल्याने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे आता करायचे काय, असा मोठा प्रश्न माझ्यासमोर पडला आहे. त्यामुळे शासनाने तातडीने आर्थिक मदत करावी.
सुरेंद्रा रामटेके, शेतकरी, तारा
--
सतत सुरू असलेल्या पावसामुळे मेंढला सर्कलमधील अनेक गावांतील शेतकऱ्यांची कपाशी, तूर, सोयाबीन, संत्री व मोसंबी या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना तातडीने शासनाकडून आर्थिक मदत मिळावी यासाठी पाठपुरावा करणार आहे.
मयूर उमरकर, सदस्य, पंचायत समिती, नरखेड
090921\img_20210909_081612.jpg
फोटो ओळी 1. भारसिंगी येथील जाम नदीच्या पुलावरून वाहत असलेले पाणी.
फोटो ओळी 2: पुलावरील पाणी ओसरल्या नंतर वाहतूक सुरळीत झालेली वाहतूक.
फोटो ओळी 3. पुलावरून पाणी असल्यामुळे जलालखेडा बस स्थानकात थांबलेल्या बसेस.
फोटो ओळी 4. पुराच्या पाण्यामुळे शेतातील झालेले नुकसान.