लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केंद्र शासनाच्या तीन वर्षांच्या कामगिरीचा आढावा मांडण्यासाठी देशातील २९९ शहरांसोबत नागपुरातदेखील ‘मोदी’ फेस्टचे (मेकिंग अॅन्ड डेव्हलप्ड इंडिया) आयोजन करण्यात आले होते. मात्र आयोजनाची जबाबदारी असलेल्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे उत्सवाला फटका बसला. भाजपाच्यादेखील अनेक कार्यकर्त्यांना अशाप्रकारचा उत्सव महालातील चिटणीस पार्कमध्ये असल्याचे माहीत नव्हते. भाजपाच्या मोठ्या नेत्यांपासून ते कार्यकर्त्यांनी या उत्सवाकडे पाठच फिरविली व स्थानिक आयोजकांमुळे केंद्र शासनाचा उपक्रम अक्षरश: ‘फ्लॉप शो’ ठरल्याचे दिसून आले. गेल्या तीन वर्षांमध्ये केंद्र सरकारच्या विविध योजना आणि पुढाकारांविषयी जनतेसोबत संवाद साधण्याच्या उद्देशाने चिटणीस पार्क येथे १० ते १२ जून या कालावधीत याचे आयोजन करण्यात आले होते. आयोजनाची जबाबदारी भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षा शिवानी दाणी यांच्याकडे देण्यात आली होती. नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारखे मोठे नेते आहेत. गडकरी व फडणवीस नागपुरात नसल्याने या कार्यक्रमाला जाऊ शकले नाही. मात्र शहरातील एकही आमदार तसेच राज्यसभा खासदारानेदेखील या उत्सवाला भेट दिली नाही. इतकेच काय पण नगरसेवक व भाजपाचे कार्यकर्तेदेखील भटकले नाहीत. मुळात या उत्सवाची बहुतांश जणांना माहितीच नव्हती. कार्यक्रमाच्या प्रचार- प्रसारासाठी योग्य प्रसारमाध्यमांची निवडच करण्यात आली नव्हती. प्रचारच नसल्यामुळे नागरिकांना माहिती मिळालीच नाही. परिणामी आयोजनस्थळी केवळ ‘स्टॉल्स’ आणि रिकाम्या खुर्च्या असेच चित्र होते. यामुळे कार्यक्रमाच्या आयोजनाच्या केंद्र शासनाच्या उद्दिष्टालाच हरताळ फासल्या गेला. कार्यकर्त्यांची नाराजी भोवली शिवानी दाणी यांच्याबाबत भारतीय जनता युवा मोर्चाच्या अनेक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर असतो. त्यांच्या कार्यप्रणालीवरून अनेक जण नाखूश आहेत. ‘मोदी’ फेस्टची जबाबदारी त्यांच्याकडे आहे, असे कळल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरविली. उद्घाटनाचा कार्यक्रम सोडला तर बाकी तीनही दिवस रिकाम्या खुर्च्याच दिसून आल्या चौकटीपुरताच कार्यक्रम मर्यादित ‘मोदी’ फेस्टच्या आयोजनाची जबाबदारी शिवानी दाणी यांच्याकडे होती. एरवी लहानसहान कार्यक्रमांचा त्यांच्याकडून प्रसारमाध्यमे आणि ‘सोशल मीडिया’ मोठ्या प्रमाणात प्रचार-प्रसार करण्यात येतो. मात्र केंद्र शासनाशी संबंधित कार्यक्रम असूनदेखील ‘मोदी’ फेस्टला आयोजकांनी एका चौकटीपुरतेच मर्यादित ठेवले. संघाचा बालेकिल्ला असलेल्या महालात आयोजन असूनदेखील तेथीलच बऱ्याच कार्यकर्त्यांना याची माहिती नव्हती. यावरूनच किती ढिसाळ नियोजन होते, हे स्पष्ट होत आहे.
‘मोदी’ फेस्ट ठरला ‘फ्लॉप शो’
By admin | Published: June 15, 2017 2:01 AM