नागपूर : पाश्चिमात्य असला तरी प्रेमाचा गहिवरच सर्वत्र एकसारखाच असतो. मग, तुम्हाला आवडो वा ना आवडो! प्रेमीयुगुलांनी धरलेल्या प्रेमाच्या वाटेला अडवून धरणाऱ्यांचा जोर जसजसा वाढतो आहे. तसतसा ती अडथळे पार करण्यास धजावणाऱ्यांचीही ठसन वाढत आहे. सोमवारी ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी असेच काहासे चित्र दिसून आले.
प्रेमीयुगुलांचे ‘गुटरगू’ तुम्हाला-आम्हाला माहीत नसलेल्या, सांगायचे झाले तर त्यांनाच ठाऊक असलेल्या ‘अननोन’ स्थळी चालले. त्यामुळे, प्रेमदिनाला फुलणारे फुटाळा, अंबाझरीसारखी स्थळे ओस पडली होती. भगव्या संघटनांनी आधीच दिलेला इशारा बघता, पोलीसांचा तगडा बंदोबस्त तरुणाई फुलणाऱ्या स्थळांवर होता. मात्र, देशभरातील तरुणाईच्या मुखात असणारा ‘पुष्पा’ आणि त्याच्या ‘डायलॉगबाजी’चा परिणाम म्हणून हे प्रेमीयुगुल ‘हमें फ्लॉवर समझे क्या, हम भी फायर है... झुकेंगे नहीं’ म्हणत, त्यांनी थेट शहराच्या बाहेरचा रस्ता गाठला. तर कुणी ‘कपल पॉईंट’ असलेल्या रेस्टेराँ, हॉटेल्स, कॅफे आदींमध्येच सेलिब्रेट करताना आढळत होते.
देशप्रेमाचा रंग... शहिदांना नमन
सारा देश ‘व्हॅलेंटाईन डे’ला प्रेमात आकंठ बुडाला असताना १४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा येथील दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघातकी हल्ल्यात सीआरपीएफच्या सैनिकांना वारमरण प्राप्त झाले होते. त्या घटनेला तीन वर्ष उलटले असून चौथ्या स्मृतीदिनी त्यांना नमन करण्यात आले. अजनी चौक येथे ‘अमर जवान स्मारक’ येथे मेणबत्त्या लावून शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
बजरंग दलाची रॅली
हिंदुत्त्ववादी संघटना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पश्चिमी सभ्यता असलेल्या ‘व्हॅलेंटाईन डे’चा विरोध करण्यासाठी रविवारीची इशारा रॅली काढली होती. सोमवारीही फुटाळा, अंबाझरी, सेमीनरी हिल्स आदी तरुणाई फुलणाऱ्या स्थळांवर रॅली काढून अश्लाल कृत्य करणाऱ्यांचा विरोध केला.
हम भी है जोश में!
विरोध होणार, याची जाणाव आता प्रत्येक प्रेमीयुगुलांना झाली आहे. त्यामुळे, अनेक युगुलांनी आधीच शहराबाहेर जाण्याची नियोजन केले होते. काहींनी आपल्या नेहमीच्या कट्ट्यांवरच हा दिवस साजरा केला. मात्र, काहींनी ‘हम भीं है जोश में’ म्हणत फुटाळा, अंबाझरी, सेमीनरी हिल्स आदी स्थळे गाठून आपल्या प्रेमाला वेगळा आयाम देण्याचा प्रयत्न केला.
संध्याकाळ होताच...
साधारणत: ही स्थिती दरवर्षीची असते. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत विरोधक जागृत असतात आणि संध्याकाळच्या वेळी सगळे दडून बसतात. ही बाब आता प्रेमीयुगुलांनाही समजून चुकली आहे. सोमवारीही तशीच स्थिती होती. संध्याकाळ होताच सगळी स्थळे फुलायला लागली होती. विशेषत: मोठमोठ्या हॉटेल्स, रेस्टेराँमध्ये ‘व्हॅलेंटाईन डे’च्या विशेष तयारी करण्यात आली होती.
पोलिसांचाही बंदोबस्त
कुठलेही अघटित घडू नये, यासाठी पोलीस सदैव तत्पर असतात. सोमवारीही पोलीस महत्त्वाच्या स्थळांवर दक्ष राहून पहारा देत होते. प्रेमीयुगुल आढळताच, त्यांची समजूत काढून त्यांना परत पाठवत होते.
मातृपितृ दिनाच्या शुभेच्छा
‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणजे केवळ प्रेमीयुगुलांचाच दिवस असतो असे नाही. या दिवशी अनेक धार्मिक संघटना ‘मातृपितृ दिवस’ साजरा करतात. त्याअनुषंगाने प्रेमभावनेच्या शुभेच्छा संदेशासह मातृपितृ दिवसाच्या शुभेच्छाही देण्यात येत होत्या. सोशल मिडिया अशा संदेशांनी भरलेला होता. अनेकांनी पुलवामा घटनेच्या स्मृतींना उजाळा देत देशप्रेमाची ज्वाळाही बळकट केली.
....