नागपूर : लॉकडाऊनचा फटका फूलउत्पादक शेतकऱ्यांना पहिल्याच दिवशी बसला. मार्केट बंद असल्याने अनेक शेतकऱ्यांनी मालच आणला नाही. ज्यांनी आणला, त्यांना ५ ते १० रुपये किलो दराने फुले विकावी लागली. या परिस्थितीमुळे फुले कोमेजली अन् शेतकऱ्यांचे चेहरेही !
गुलाब, लिली, शेवंती, कलर, डेझी ही फुले नागपूरच्या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात येतात. जिल्ह्यातील फूलउत्पादक शेतकऱ्यांचा यात समावेश अधिक असतो. फुले नाशिवंत असल्याने तोड झाल्याबरोबर तात्काळ विक्रीला आणावी लागतात, अन्यथा मातीमोल होतात. यावेळी लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद असल्याने मार्केटमध्ये आणण्यापूर्वीच ती मातीमोल झाली.
प्रशासनाने परवानगी नाकारल्याने सोमवारी सकाळी फुलांचा बाजार उघडलाच नाही. परिसरातील काही शेतकऱ्यांनी विक्रीसाठी फुले आणली. मात्र, परस्पर विकून गावाकडे परतावे लागले. ५ ते १० रुपये किलोच्या दराने त्यांना माल विकावा लागला. नागपुरातील फुलांच्या बाजारपेठेत स्थानिक शेतकऱ्यांकडून दररोज सरासरी ६ ते १० लाख रुपयांची उलाढाल होते. सोमवारी मात्र १० हजार रुपयांच्या पुढे हा आकडा सरकला नाही. महात्मा फुले पुष्पउत्पादक असोसिएशनचे अध्यक्ष जयंत रणनवरे म्हणाले, इतर वेळी फुलांचा दर ६० ते १०० रुपये किलो असतो. मात्र, सोमवारी बाजारच न भरल्याने शेतकऱ्यांना मातीमोल भावाने ती विकावी लागली. माल फेकण्यापेक्षा मिळेल तो भाव त्यांनी घेतला.
...
शेतकरी हतबल ()
लॉकडाऊनमुळे फूलउत्पादक शेतकरी हतबल दिसले. हिंगणा तालुक्यातील वाघ (उमरी) येथील शेतकरी किशोर वाघ यांनी सोमवारी दुपारीच आपल्या दीड एकर शेतातील फुले तोडून फेकली. ते म्हणाले, भाव कमी असल्याने बाजारात न्यायला परवडत नाही. झाडावर तशीच ठेवली, तर झाड खंगते. त्यामुळे तोडाईचे नुकसान झेलून त्यांनी चक्क फुले शेतातच फेकली. वारंगा येथील शेतकरी राहुल थूल यांनी रविवारी फुले तोडून ठेवली होती. सकाळी मार्केटमध्ये आणल्यावर १० रुपये किलोने विकावी लागली. या गावातील सात ते आठ शेतकरी जय साईराम फुल उत्पादक बचत गट चालवितात. या सर्वांनाच फटका बसला.
...
पालकमंत्र्यांनी विनंती फेटाळली
महात्मा फुले पुष्प उत्पादक असोसिएशनने पालकमंत्री नितीन राऊत यांच्याकडे दोन दिवसांपूर्वी निवेदन देऊन फूल बाजार सकाळी ७ ते ९ या वेळेत उघडण्यास परवानगी मागितली होती. मात्र, ती पालकमंत्र्यांनी फेटाळली. सर्व मार्केट बंद असताना फुले कोण घेणार, असा प्रश्न विचारून त्यांनी या विनंतीला नकार दिला. त्यामुळे फुलांचा बाजार सोमवारी उघडलाच नाही.
...