नागपूर : महाराष्ट्रात कोरोना लॉकडाऊन आणि जिल्हा बंदी असल्याने बहुतांश खासगी ट्रॅव्हल्स मार्च महिन्याच्या मध्यापासून बंद आहेत. आवश्यक तेवढ्याच १० टक्के खासगी बसेस रस्त्यावर धावत आहेत. पण प्रवाशांकडे ई-पास नाहीतच. आतापर्यंत कोणत्याही खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई न झाल्याने खासगी ट्रॅव्हल्सला रान मोकळे, ना मास्क, ना सॅनिटायझर अशी स्थिती आहे.
लॉकडाऊनपूर्वी नागपुरातून संपूर्ण महाराष्ट्र आणि छत्तीसगड, मध्य प्रदेश राज्यात दररोज जवळपास २५० धावत होत्या. जवळपास ५० बस संचालकांतर्फे बसेसचे संचालन करण्यात येते. कोरोनाच्या कडक निर्बंधामुळे बसेसमध्ये ५० टक्के प्रवासी संख्येचा नियम आहे. पण जिल्हाबंदी आणि वर्क फ्रॉम होममुळे पुणेसह अन्य जिल्हे वा राज्यातील तरुण नागपुरातूनच काम करीत आहे. त्यांचा प्रवास बंद आहे. शिवाय पुणेसह अन्य जिल्ह्यांतून फार कमी प्रवाशांची ये-जा आहे. अनेकदा प्रवासी कमी मिळत असल्याने बस चालविणे परवडत नाहीत. त्यामुळे बस रद्द करावी लागते. कोरोना लॉकडाऊनमुळे खासगी बसचालकांना तोटा होत आहे. त्यामुळे अनेकांनी बससेवा बंद केल्याचे खुराणा ट्रॅव्हल्सचे राणा खुराणा यांनी सांगितले.
अनेक प्रवासी मास्क वा सॅनिटायझरचा उपयोग करीत नाही. पण बस संचालकांनी बसेसमध्ये सॅनिटायझरचा व्यवस्था केली आहे. ट्रॅव्हल्स कंपन्या नियमांचे पालन करतात. बसेस फारच कमी धावत असल्याने कोणत्याही बसेसवर आतापर्यंत कारवाई झाली नसल्याचे खुराणा यांनी स्पष्ट केले. प्रवासी फारच कमी असल्याने डिझेलचा खर्चही परवडत नाही. सध्या डिझेलच्या वाढत्या दरामुळे नागपूर-पुणे मार्गावर बस चालविणे कठीण आहे. याकरिता ५० टक्के प्रवासी आवश्यक असते. एप्रिल महिन्यात फार कमी संचालकांनी बस पुण्याला नेली. आता राज्य शासनाने लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढविल्याने बससेवा ठप्प राहणार आहे. सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. प्रवासी मिळाल्यास बससेवा सुरू करण्यास हरकत नाही, असे खुराणा म्हणाले.
अशी आहे आकडेवारी :
- रोज शहरातून जाणाऱ्या ट्रॅव्हल्स २० ते २२
- रोज शहरात येणाऱ्या ट्रॅव्हल्स २५ ते ३०
- प्रवाशांची संख्या ६५०
ना मास्क, ना सॅनिटायझर
बैद्यनाथ चौकात खासगी बसेसची पाहणी केली असता अनेक प्रवाशांनी मास्क घातले नव्हते. सीटवर बसल्यानंतर मास्क घालू असे उत्तर मिळाले. काही जणांजवळ सॅनिटायझर नव्हते. सॅनिटायझरची व्यवस्था बसमध्ये होती. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने प्रवासी बेफिकीर दिसले.
बसेसवर कारवाई नाही
मार्च महिन्याच्या मध्यापासून ९० टक्के बसेस बंद आहेत. सुरू असलेल्या दहा टक्के बसेसमध्ये प्रवासी मिळत नसल्याने अनेकदा बस रद्द कराव्या लागतात. अर्थात बसेस धावत नसल्याने कारवाई होत नाही. आतापर्यंत कोणत्याही बसेसवर पोलीस वा आरटीओने कारवाई केलेली नाही.
ई-पास कोणाकडेही नाही
बसेस धावताना ई-पास कुणाकडे आहे, याची तपासणी केली जात नाही. बसेस संचालक ई-पास तपासण्याच्या भानगडीत पडत नाही. जिल्हा बंदी असल्याने प्रवाशाला एकातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पासची गरज असते. पण ट्रॅव्हल संचालक त्याची तपासणी करीत नसल्याचे दिसून आले.