वसीम कुरेशी
नागपूर : रिजनल कनेक्टिव्हिटी सर्व्हिस (आरसीएस) अंतर्गत ‘फ्लायबिग’ विमान कंपनी पुढील वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवासी सेवा सुरू करण्याची शक्यता आहे. या संदर्भात नागपूर विमानतळाचे संचालन करणारी कंपनी मिहान इंडिया लिमिटेडसोबत (एमआयएल) कंपनीच्या अधिकाऱ्यांची चर्चा झाली आहे. अलीकडेच तयार झालेल्या विमान कंपनीचे चाचणी उड्डाण ४ डिसेंबरला हैदराबाद, नागपूर आणि इंदूरपर्यंत झाले आहे.
या आठवड्यात कंपनीला नागरी उड्डयन संचालनालयाकडून (डीजीसीए) एओपी मिळणार आहे. त्यानंतर २३ डिसेंबरपासून इंदूर, अहमदाबाद, भोपाळ आणि रायपूरकरिता व्यावसायिक उड्डाण सुरू करणार आहे. याकरिता एटीआर ७४-५०० विमानाचा उपयोग करणार असून त्याची प्रवासी क्षमता ७२ सिटची आहे. एअरलाईन्स आपल्या नेटवर्कमध्ये नागपूरला जोडण्यास रुची दाखवित आहे. फ्लाईबिग नागपुरातून गोंदिया, हैदराबाद, इंदूरकरिता उत्तम व्यवसाय पाहात आहे. ही विमानेसवा सुरू झाल्यास नागपूरकरांना मोठा फायदा होणार आहे. आरसीएस विमानामुळे याचे भाडेही कमी असणार आहे.
एक वर्ष आरसीएसवर भर राहणार
एका वर्षांत टू-टायर शहरांमध्ये रिजनल कनेक्टिव्हिटी सर्व्हिस (आरसीएस) अंतर्गत उड्डाण सुरू करण्याचे लक्ष्य आहे. एका वर्षात पाच एटीआर विमाने येणार आहेत. पहिल्या फ्लाईटनंतर दुसरी फ्लाईट फेब्रुवारीमध्ये सुरू करण्याचा प्रयत्न आहे. यात गोंदिया, नागपूर, इंदूर आणि हैदराबादचा समावेश करण्यात येईल. पुढील वर्षी एअरबस विमान ताफ्यात सहभागी होतील.
रतन आंभोरे, हेड-स्टेट एअरपोर्ट ऑपरेशन्स, फ्लायबिग.
फ्लायबिगसोबत झाली चर्चा
फ्लायबिग एअरलाईन्ससोबत नागपुरातून विमानसेवा सुरू करण्यावर चर्चा झाली आहे. तयारी असेल तर कंपनीला विमानतळावर आवश्यक सेवा उपलब्ध करून देण्यात येईल.
आबिद रुही, वरिष्ठ विमानतळ संचालक, मिहान इंडिया लिमिटेड.