पालकमंत्र्यांनी दिले कामाचे पुनर्विलोकन करण्याचे आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इंदोरा चौक ते अग्रसेन चौक, अशोक चौक मार्गे उमरेड रोडवरील शीतला माता चौकापर्यंत उड्डाणपूल होणार आहे. हा उड्डाण पूल झाल्यास ७.३० किलोमीटरचा प्रवास ५.०६५ किलोमीटरवर येईल. या मार्गावर उड्डाणपूल व रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव निर्णयार्थ होता. शुक्रवारी पालकमंत्री नितीन राऊत यांनी यासंदर्भात बैठक आयोजित करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या (एनएचआय) अधिकाऱ्यांना यावर पुनर्विलोकन करण्याचे आदेश दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीत जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे व्यवस्थापक नरेश वडेट्टीवार, प्रकल्प संचालक एन. एल. येवतकर, डागा स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका सीमा पारवेकर उपस्थित होत्या. राष्ट्रीय महामार्ग ४४वर प्रस्तावित या उड्डाणपुलाच्या कामाचे सादरीकरण यावेळी करण्यात आले.
पालकमंत्री राऊत यांनी यावेळी इंदोरा चौक प्रस्तावित सबवे करताना त्या मार्गावर असलेल्या फूलविक्रेत्यांचे व कमाल चौकापासून चांभारनाला यादरम्यानच्या दुकानदारांच्या पुनर्वसनाचाही आराखड्यात समावेश करावा, असे निर्देश दिले. तसेच अधिकाऱ्यांनी पुन्हा या ठिकाणी भेट देऊन अहवाल सादर करावा. तसेच या प्रकल्पामुळे डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयातील जी जागा अधिग्रहीत केली जाणार आहे, त्यातील इमारती किंवा नेत्ररोग विभागासाठी नवीन इमारत बांधण्यासाठी निधी एनएचएआयने उपलब्ध करून द्यावा, असेही सांगितले.
बॉक्स
असा राहील उड्डाणपूल
प्रस्तावित उड्डाणपूल
हा प्रस्तावित उड्डाण पूल इंदोरा चौक येथून सुरू होईल. कमाल चौक - पाचपावली चौक - अग्रसेन चौक - अशोक चौक - रेशीमबाग चौक - सक्करदरा चौक - भांडेप्लॉट मार्गे शीतला माता चौकापर्यंत राहील.