नागपूर : डॅसॉल्ट एव्हिएशनने भारतीय सैन्य दलासाठी ‘३६ राफेल’ विमाने देण्याचा निर्णय घेतला असला तरी नागपुरात कंपनीचे जास्त लक्ष ‘फाल्कन-२०००’ विमानांच्या निर्मितीवर राहणार असल्याची माहिती डॅसॉल्ट एव्हिएशनचे चेअरमन आणि डॅसॉल्ट रिलायन्स एरोस्पेस लि.चे (डीआरएएल) एरिक ट्रापियर यांनी शुक्रवारी दिली.मिहान-सेझमधील अनिल अंबानी यांच्या रिलायन्स एडीए समूहाच्या धीरुभाई अंबानी एरोस्पेस पार्कच्या कोनशिला समारंभानंतर ट्रापियर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी फ्रान्सच्या संरक्षणमंत्री फ्लोरेन्स पार्ली आणि रिलायन्स एडीए समूहाचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक अनिल अंबानी उपस्थित होते. एअरक्रॉफ्ट इंडस्ट्रीसाठी नागपूर एव्हिएशन हब बनविण्याची आपली इच्छा असल्याची माहिती ट्रापियर यांनी दिली.अनिल अंबानी म्हणाले, डॅसॉल्ट आणि रिलायन्समध्ये ५० वर्षांचा करार आहे. त्यामुळे विमान किती राहतील, यावर काहीही फरक पडणार नाही. डॅसॉल्टला जेव्हा कंत्राट मिळेल तेव्हा आम्ही विमाने बनवीत राहू, अन्यथा सुट्या भागांची निर्मिती निरंतर सुरू राहील. नागपूर प्रकल्पासाठी रिलायन्सने आधीच मुख्य कार्यकारी अधिकाºयाची नियुक्ती केली असून ३० अभियंते फ्रान्सच्या डॅसॉल्ट फॅक्टरीत प्रशिक्षण घेत आहेत. ते पुढील महिन्यात नागपुरात परत येणार आहेत. कंपनी विमानाच्या सुट्या भागांच्या निर्मितीला एप्रिल २०१८ पासून प्रारंभ होईल.
‘डॅसॉल्ट’चे राफेल जेटऐवजी ‘फाल्कन-२०००’वर लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 4:13 AM