लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अतिदुर्गम आदिवासी भागात राहणाऱ्या नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविताना या भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून द्या. तसेच शैक्षणिकदृष्ट्या आदिवासी मुले मुख्य प्रवाहापासून मागे राहणार नाहीत याची खबरदारी घ्या, असे प्रतिपादन वनामतीच्या संचालक डॉ. माधवी खोडे यांनी केले. शुक्रवारी आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठीच्या समन्वय योजना या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
“विकास आदिवासीचा : समन्वय योजनांचा” या विषयावर एकदिवसीय विभागीय कार्यशाळा वसंतराव कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती) येथे आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी अपर आदिवासी आयुक्त रवींद्र ठाकरे होते. प्रारंभी विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी कार्यशाळेस शुभेच्छा दिल्या. उपायुक्त दशरथ कुळमेथे, प्रकल्प अधिकारी आशिष येरेकर, रोहन घुगे, अनमोल सागर, शुभम गुप्ता, नितीन इसोकर, दीपक हेडाऊ, नीरज मोरे, सहायक आयुक्त नयन कांबळे, महेश जोशी, विलास कावळे, संशोधन अधिकारी संजय पाठक यावेळी उपस्थित होते.
अपर आदिवासी आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात चांगल्या गोष्टीचा अंगिकार करून विकासात्मक दृष्टिकोन ठेवून योजना राबवा, असे आवाहन केले. तसेच शैक्षणिक बाबींवरील खरेदीवर शाळानिहाय आढावा घ्या. मुलांच्या शिक्षणावर जास्तीत जास्त निधी खर्च करा. आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी मागील यशकथांचे शोधन करा व त्यातून प्रेरणा घ्या, अशा सूचनाही केल्या.