नागपूर : संरक्षणाच्या दृष्टीने तंत्रज्ञानात देश कसा आत्मनिर्भर होईल यावर लक्ष केंद्रित करा, अशा सूचना देशाचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी येथे संरक्षण क्षेत्रातील भागधारकांना दिल्या. राजनाथसिंह रविवारी नागपूर दौऱ्यावर होते.
यावेळी विमानतळावर त्यांचे आगमन झाले. तेव्हा मेन्टनन्स कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ एअर मार्शल शशिकर चौधरी यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी सैन्यातील इतर वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. राजनाथसिंह यांनी विमानतळावरच संरक्षण भागधारकांशी संवाद साधला. त्यांना प्रदेशातील लष्कर, आयएएफ आणि संरक्षण पीएसयूचा समावेश असलेल्या संरक्षण आस्थापनांनी केलेल्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली.
यावेळी राजनाथसिंह यांनी भागधारकांना बाहेरील तंत्रज्ञानाच्या बरोबरीने संरक्षण तंत्रज्ञानामध्ये आत्मनिर्भरतेवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला, तसेच कमांडर्सना जवानांच्या सुरक्षिततेचा विचार करून योग्य देखभाल आणि ऑपरेशनल पद्धतींचे पालन करण्यास सांगितले.