काटोल फेस्टीव्हल : विविध राज्यातील सांस्कृतिक कलेचे दर्शनकाटोल : शहरात प्रथमच आयोजित काटोल फेस्टीव्हल अंतर्गत दक्षिण-मध्य सांस्कृतिक केंद्राच्या सहकार्याने आयोजित लोककला महोत्सवात विविध सहा राज्यातून दाखल झालेल्या कलावंतांनी सांस्कृतिक कलेचे दर्शन घडविले. भांगडा, गुंदुबाजा, छाऊ नृत्य, जिंदवा, कालबेलिया सिद्धी धमाल आदी लोककला सादर करून प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. गणेशोत्सवानिमित्त शुक्रवारी पार पडलेल्या लोककला महोत्सवाला शेकडो नागरिकांनी हजेरी लावली.लोककला उत्सवाची सुरुवात पंजाबमधील सिंगारा सिंग यांच्या नेतृत्वात चमूने सादर केलेल्या भांगडा नृत्याने झाली. यात्रा, विवाह व शेतीकामाशी निगडित भांगडा नृत्यामध्ये बोलीभाषा व पारंपरिक वाद्यांचा उपयोग करून कलावंतांनी प्रेक्षकांना थिरकायला भाग पाडले. मध्यप्रदेशातील मंडला, शहाडोल जिल्ह्यातील आदिवासींचे गुदमबाजा हे पारंपरिक वाद्य असून त्यासोबत शहनाई, बासरी, मंजिरा व टिमकीचा उपयोग करून राधेश्याम मार्को यांच्या चमूने लावणी, गुमक, तालबंद व लहकी धून सादर केली. ओडिसातील छाऊ नृत्य नाटिकेने नागरिकांचे लक्ष वेधले. वीणेचा स्वर व डफाच्या तालावर शिवपुराणचे सादरीकरण करण्यात आले.माँ दुर्गादेवी प्रकट होऊन राक्षस महिशासूराचा वध हा प्रसंग मुखवटे व शरीराच्या विशिष्ट हालचाली, पदलालित्य व चेहऱ्यावरील हावभाव यांनी सर्वांना भारावून सोडले. जिंदवा (पंजाब) नृत्यानंतर गुजरातच्या तटीय क्षेत्रातील भरुच, भावनगर व जुनागड भागात इसनयचे अनुयायी सिद्धी हे पीर बाबा गौरच्या उर्समध्ये ढोलच्या थापेवर नृत्य सादर करतात. ढोलक वाद्यावर उमर मखवा यांनी थरारक नृत्य सादर करून तसेच नृत्यामध्ये नारळ हवेत भिरकावत डोक्यावर फोडण्याचा प्रयोग करून दाखविला. राजस्थानमधील कालबेलिया जमात नृत्य, नाथ संप्रदायातील पारंपरिक नृत्य, भवई समुदायातर्फे अबानतेला नृत्याचे सादरीकरण केले. ढोल, सारंगी, पखवाज, झांजेच्या ध्वनीला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.लोककला महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी गणेशोत्सवातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी केंद्र शासनाच्या दक्षिण-मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या माध्यमातून विविध प्रांतातील लोककला व संस्कृतीचे दर्शन घडविणे हा उद्देश असल्याचे स्पष्ट केले. याप्रसंगी माजी मंत्री रणजित देशमुख, प्रा. भाऊ भोगे, चंद्रशेखर देशमुख, दिनेश ठाकरे, मारोतराव बोरकर यांची उपस्थिती होती. यावेळी रूपाताई देशमुख यांच्या हस्ते दक्षिण-मध्य सांस्कृतिक केंद्राचे कार्यक्रम अधिकारी शशांक दंडे तसेच लोककला महोत्सवात सहभागी प्रत्येक चमूतील कलावंतांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे बहारदार संचालन प्रा. डॉ. प्रकाश पवार यांनी केले. महोत्सवाला काटोल व नरखेड परिसरातील प्रेक्षक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
लोककला महोत्सवाने पारणे फेडले
By admin | Published: September 27, 2015 2:54 AM