लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उत्तर पूर्व भारतातील आठ राज्यातील लोककलेचा अविष्कार चार दिवस दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात ‘आॅक्टेव नागपूर’ या महोत्सवात अनुभवायला मिळणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी महापौर नंदा जिचकार यांच्याहस्ते झाले. या महोत्सवात पारंपरिक लोकनृत्याबरोबरच तेथील पारंपरिक पोशाख आणि हस्तकलेचाही अनुभव घेता येणार आहे.महोत्सवाच्या उद्घाटनाला दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचा संचालक दीपक खिरवाडकर, सांस्कृतिक केंद्राच्या पश्चिम झोनचे संचालक फुर्रखान, कोलकाता केंद्राच्या संचालक गौरी बसू, गोवा सरकारच्या कला आणि सांस्कृतिक खात्याचे सचिव दौलत हवालदार, महावितरणचे मुख्य अभियंता अभय हरणे, महाजनकेचे मुख्य अभियंता राजेश पाटील यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना महापौर म्हणाल्या की, गेल्या काही वर्षात नागपूर हे ग्लोबली प्रगती करीत आहे. सध्यातर शहरात सुरू असलेल्या दोन मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि नागपुरात सातत्याने होत असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनातून नागपूरला सांस्कृतिक हब म्हणण्यास हरकत नाही.उद्घाटनानंतर मणिपूरचे पोंगचोलम व थांग था, मेघालयाचे वांगला, मिझोरम राज्यातील चेरवा, नागालॅण्डचा नागदा, सिक्कीमचा चंडी, त्रिपुराचा होझागिरी, अरुणाचल प्रदेशचा टप्पू व आसामचा रंगोली बिहू या लोकनृत्याचे सादरीकरण करण्यात आले. या लोकनृत्य कलावंतांनी पारंपरिक वेशभूषा, पारंपरिक वाद्यावर तेथील लोककलेची अनुभूती नागपूरकरांना करवून दिली.