लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मनपा सभागृहामध्ये सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर महापौरांनी दिलेल्या निर्देशांचे पालन करा, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा महापौरांद्वारे गठित अनुपालन पूर्तता समितीचे सभापती ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी मंगळवारी समितीच्या बैठकीत दिला.
बैठकीमध्ये २०१८ आणि २०१९मध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेतील विविध विषयांच्या संदर्भात चर्चा कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. २० मार्च २०१८च्या स्थगित सभेमध्ये रस्त्यावर व दुभाजकावर मारण्यात येणाऱ्या पेंट संदर्भात प्रश्न विचारला होता. यामध्ये त्यांनी नमूद केल्यानुसार २०१३-१४मध्ये संबंधित कामावर ४४ लक्ष ३७ हजार २७८ हजार रुपये खर्च करण्यात आला. यामधील बरीच कामे निविदा न बोलावता आवेदनाद्वारे देण्यात आल्याचा आरोपही केला होता. यावर महापौरांनी आयुक्त व अतिरिक्त आयुक्तांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. आयुक्तांनी यावर चौकशी अहवालामध्ये थर्मोप्लास्टिक पेंटमध्ये ग्लासबिडचा वापर करताना दक्षता घेण्याचे सूचित केले होते. यावर प्रत्यक्ष खर्च व प्रत्यक्षात कारवाई अहवाल महापौरांकडे सादर करण्याचे निर्देश यावेळी अनुपालन पूर्तता समितीने दिले.
कॅमेरा प्रकरणात फौजदारी गुन्हा दाखल करा
शिक्षण विभागाद्वारे कॅमेरे खरेदी प्रकरणात झालेल्या घोळासंदर्भात सभागृहामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. शिक्षण विभागाद्वारे १० हजार ९९० रूपये प्रतिनग याप्रमाणे सोनी मॅक कंपनीचे ३ लक्ष २९ हजार ७३० रूपये किंमतीचे २९ कॅमेरे खरेदी करण्यात आले होते. यापैकी १० कॅमेरे गहाळ करण्यात आल्याचे प्रकरण पुढे आले होते.यात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते.त्यानुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश सामान्य प्रशासन विभागाला दिले.