लाेकमत न्यूज नेटवर्क
वाडी : नगर परिषद प्रशासनाने वाडी शहरात डेंग्यू प्रतिबंधक उपाययाेजना करायला सुरुवात केली आहे. यात शहरातील नागरिकांनी आठवड्यातील एक दिवस काेरडा दिवस पाळावा,असे आवाहन पालिकेचे मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी केले.
शहरात डेंग्यूचा प्रसार हाेऊ नये, यासाठी नगर परिषदेच्यावतीने प्रतिबंधात्मक उपाययाेजना केल्या जात आहेत. यासाठी ५२ आशासेविका व पाच नोडल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली असून, हे कर्मचारी घराेघरी जाऊन डेंग्यूबाबत जनजागृती करीत आहेत. नागरिकांना आठवड्यातील एक दिवस काेरडा दिवस पाळण्याच्या सूचना देत असल्याचेही मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी सांगितले.
आशासेविकांमार्फत नागरिकांना डेंग्यूची लक्षणे, हिवतापाचे चक्र व प्रतिबंधात्मक उपायाबाबतचे माहितीपत्रकांचे वाटप व साेबतच डेंग्यू रुग्णांचे सर्वेक्षण केले जात आहे. प्रत्येक घरातील कबाडी साहित्य, टायर, पाण्याचे हौद, चेंबर्स, बॅरल, फ्रीज, कुलर याची तपासणी केली जात असून, हे साहित्य स्वच्छ व काेरडे ठेवण्याचे तसेच घर व घराचा परिसर साफ ठेवण्याबाबत सूचना दिल्या जात आहेत. या सर्वेक्षणात घरात साचलेल्या पाण्यात डेंग्यूच्या अळ्या आढळल्यास दंडात्मक कार्यवाही केल्या जाणार असल्याचेही जुम्मा प्यारेवाले यांनी स्पष्ट केले.
....
१० कर्मचाऱ्यांची नियुक्ती
शहरातील नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी तसेच शहराच्या विविध भागात मशीनद्वारे डासप्रतिबंधक औषधांची धुरळणी करण्यासाठी १० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती पालिकेचे मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी दिली. ज्या भागात पावसाचे अथवा सांडपाणी साचले आहे, त्या नाल्या व डबक्यांमध्ये डासप्रतिबंधक तेल साेडले जात आहे. या कामांची पाहणी करण्याची जबाबदारी नाेडल अधिकाऱ्यांवर साेपविली आहे. या सर्व उपाययाेजना जिल्हाधिकारी विमला आर. यांच्या आदेशान्वये केल्या जात असल्याचेही जुम्मा प्यारेवाले यांनी स्पष्ट केले.
290721\3631img_20210729_160546.jpg
फोटो:फॉगिंग मशिनद्वारे धुरळणी करताना नप कर्मचारी