नागपूर : नागपुरात होणारे हिवाळी अधिवेशन यंदा नागपुरात होणार की नाही, याबाबतचा अंतिम निर्णय अजूनही झालेला नाही. दरम्यान, हे अधिवेशन मुंबईत घेण्याच्या हालचाली सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर विदर्भवाद्यांनी मात्र शासनाला नागपूर कराराचे पालन करा आणि अधिवेशन नागपुरात घ्या, अशी ठाम भूमिका घेतली आहे.
- अधिवेशनाबाबत शासनाचे अजूनही काही ठरलेले नाही. वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. परंतु सध्या असे म्हणता येईल की, नागपूर कराराप्रमाणे हिवाळी अधिवेशन हे नागपुरातच व्हायला हवे. राज्य शासनानेसुद्धा कराराचे पालन करीत नागपुरात अधिवेशन घ्यावे आणि येथील प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करावा.
- वामनराव चटप, माजी आमदार, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते
- कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेच्या अपेक्षेमुळे दरवर्षी हिवाळ्यात होणारे अधिवेशन नागपूरला न होता परत मुंबईला डिसेंबर महिन्यात होत आहे. मागील वर्षीसुद्धा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन झाले नाही. वैधानिक मंडळाची स्थापना नसल्यामुळे माननीय राज्यपालांद्वारे निधी वाटपाचे निर्देशसुद्धा शासनाला दिले जात नसल्याने, विदर्भ-मराठवाड्यातील विकासाला गती देण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात झाल्यास महाराष्ट्रातील मागासलेले प्रदेश विदर्भ व मराठवाड्याला न्याय मिळू शकेल.
- डॉ. संजय खडक्कार, माजी तज्ज्ञ सदस्य, विदर्भ वैधानिक विकास मंडळ
- नागपूर कराराचा सन्मान म्हणून विदर्भाच्या विकासासाठी असलेली प्रतिबद्धता सिद्ध करण्यासाठी आणि या प्रदेशाच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी नागपूरचे हे हिवाळी अधिवेशन दरवर्षी व्हावे, असा नियम आहे. विदर्भातील उद्योगधंदे, बेरोजगारी, कृषी, शेतकरी आत्महत्या, सिंचन, पर्यटन, गुंतवणूक, सर्वांगीण विकास असे अनेक प्रश्न प्रलंबित असून, यावर उपाययोजना करण्यासाठी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाला फार महत्त्व आहे. नागपूर करारानुसार हे हिवाळी अधिवेशन ज्या हेतूसाठी भरविले जाते, तो हेतू त्यातून पूर्णत्वास जात नसेल तर विदर्भाचा विकास होणारच नाही.
- आशिष देशमुख, माजी आमदार
-- नागपुरातील अधिवेशन वारंवार मुंबईला पळवून नागपूर कराराचे उल्लंघन करण्याचे काम राज्य सरकार वारंवार करीत आहे. हा विदर्भावर मोठा अन्याय आहे. यांच्या अशा विदर्भविरोधी धोरणामुळे वारंवार नागपूरसहित विदर्भावर अन्याय करण्याचे काम हे सरकार करीत आहे. जेव्हापासून राज्यात तिघाडी सरकार अस्तित्वात आले, तेव्हापासून पहिले अधिवेशन सोडता एकही अधिवेशन या नागपूर शहरात झाले नाही.
- कृष्णा खोपडे, आमदार, भाजप