प्रशासनावर टीका करण्यापूर्वी आधी स्वत: नियमांचे पालन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 10:19 PM2020-08-27T22:19:47+5:302020-08-27T22:20:58+5:30
कोरोना संक्रमणापासून स्वत:चे व समाजाचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने शारीरिक अंतरासह इतर नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. तसेच, वाढत्या कोरोना संक्रमणाचे प्रशासनावर खापर फोडण्यापूर्वी नागरिकांनी आधी स्वत: शिस्त पाळली पाहिजे, अशी समज मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी गुरुवारी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमणापासून स्वत:चे व समाजाचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने शारीरिक अंतरासह इतर नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. तसेच, वाढत्या कोरोना संक्रमणाचे प्रशासनावर खापर फोडण्यापूर्वी नागरिकांनी आधी स्वत: शिस्त पाळली पाहिजे, अशी समज मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी गुरुवारी दिली. न्या. दत्ता गेल्या सोमवारपासून नागपूरमध्ये आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात गुरुवारी न्या. दत्ता व न्या. अतुल चांदुरकर यांच्या न्यायपीठासमक्ष कोरोना मारक औषधांचा तुटवडा व इतर प्रश्नांसंदर्भातील जनहित याचिकेवर सुनावणी झाली. दरम्यान, न्या. दत्ता यांनी नागरिकांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घातले. संपन्न वर्गातील नागरिक रोज सायंकाळी बिनधास्त बाहेर फिरायला जातात. दरम्यान, ते कोणत्याही सुरक्षा नियमांचे पालन करीत नाहीत. नागरिकांच्या अशा निष्काळजीपणामुळे प्रशासन व आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवणे कठीण जात आहे, असे मत न्या. दत्ता यांनी व्यक्त केले. तसेच, या परिस्थितीत सुधारणा व्हावी याकरिता तीन आठवड्यांमध्ये प्रभावी उपाययोजनांची माहिती सादर करण्यात यावी, असे निर्देश याचिकाकर्ते व जिल्हा विधिज्ञ संघटनेचे अध्यक्ष अॅड. कमल सतुजा यांना दिले.
यावेळी याचिकाकर्त्याचे वकील अॅड. श्रीरंग भांडारकर यांनी कोरोना मारक औषधांच्या तुटवड्याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. राज्यामध्ये सर्वत्र कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सर्वत्र रेमडेसिवीरसह अन्य कोरोना मारक औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. विदर्भातील रुग्णांना कोरोना मारक औषधांच्या तुटवड्याचा फटका सहन करावा लागत आहे, असे त्यांनी सांगितले.