नागपूर : जिल्हा परिषद, नागपूर अंतर्गत शाळांमध्ये तसेच शिक्षण विभागाच्या प्रशासकीय यंत्रणेतील विविध पदांच्या अनेक जागा रिक्त आहेत. या सर्व जागा शिक्षकांमधून पदोन्नतीने भरण्यात याव्यात. पदोन्नतीची व समुपदेशनाची ही प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पार पाडण्यात यावी, अशी मागणी शिक्षकांकडून व्हायला लागली आहे.
जिल्हा परिषद, नागपूर अंतर्गत पदोन्नतीची शिक्षण विस्तार अधिकारी ११, केंद्रप्रमुख १५, उच्च श्रेणी मुख्याध्यापक १५ व विषय पदवीधर शिक्षकांची १०० पेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. एवढेच नव्हे तर केंद्रप्रमुखांची आणखी १०० पदे रिक्त आहेत. या सर्व रिक्त जागा भरण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडून मार्च महिण्यात पदोन्नती प्रक्रिया सुरू केली होती. परंतु ती प्रक्रिया मध्येच बंद पडली. नुकतीच उच्च श्रेणी मुख्याध्यापकांची २७ पदे यापूर्वीच्या पदावनत उच्च श्रेणी मुख्याध्यापकांमधून भरण्यात आली. त्यांचे समुपदेशनाची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने झूम मीटिंगद्वारे पार पाडण्यात आली.
त्याच प्रकारे शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, विषय पदवीधर शिक्षक व उर्वरित उच्च श्रेणी मुख्याध्यापक यांच्या पदाकरिताची पदोन्नतीची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पार पाडावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष लीलाधर ठाकरे, सरचिटणीस अनिल नासरे यांच्यातर्फे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना करण्यात आली.
- मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन
सेवानिवृत्तीमुळे आणि पदोन्नती प्रक्रिया राबविण्यात न आल्यामुळे रिक्त पदांच्या संख्येत वाढ होत गेली. गेल्या दोन महिन्यांपूर्वी ही पदे भरण्याची कार्यवाही जिल्हा परिषदेने सुरू केली. त्याबाबत पत्र काढून गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून रिक्त पदाची माहिती मागविण्यात आली. शिक्षकांकडून विकल्प घेण्यात आले; परंतु पुढे मात्र ही पदोन्नती प्रक्रिया जैसे थे राहिली. यासंबंधाने अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष धनराज बोडे व सरचिटणीस वीरेंद्र वाघमारे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन देऊन शिक्षण विभागातील रिक्त पदे शिक्षकांमधूनच पदोन्नतीने भरण्याची मागणी केली.