- अनेक बुद्धविहार आणि सामाजिक संघटनाही करताहेत कोरोना रुग्णांची सेवा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बुद्धांची करुणा, मैत्रीची शिकवण अजोड होती. अडचणीत असलेल्या प्रत्येक दिन दुखितांच्या मदतीसाठी, सेवेसाठी सदैव आपल्या मनाची दारे खुली ठेवलेल्या बुद्धांनी कधीही भेदभाव ठेवला नाही. संपूर्ण आयुष्य केवळ लोकांच्या कल्याणासाठीच देह झिजविला. कोरोना महामारीच्या भीषण परिस्थितीत प्रत्येक जीव संकटात आहे. अशावेळी अनुयायांनी बुद्धांची करुणा, ती मैत्री भावना अंगीकारून दिन दुखितांच्या मदतीसाठी धाव घेतली आहे. यावेळी बुद्धांच्या दान पारोमिताचे सूत्र अंगीकारत अनुयायी रुग्णांच्या मदतीसाठी काम करीत आहेत. जगप्रसिद्ध दीक्षाभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी स्मारक समितीतर्फे, तर डॉ बाबासाहेब आंबेडकर हेल्थ फाउंडेशनचे मंगल मैत्री कोविड केअर सेंटर किंवा नागलोक येथील दि बुद्धा चॅरिटी कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून समस्त रुग्णांसाठी करुणेचा आणि मैत्रीचा प्रवाह प्रवाहित केला आहे. यासोबतच नागपुरातील विविध बुद्ध विहार आणि सामाजिक संघटनांतर्फे कोरोना रुग्णांची सेवा केली जात आहे.
दीक्षाभूमी
दीक्षाभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, समता सैनिक दल आणि समता आरोग्य प्रतिष्ठान यांच्या वतीने चॅरिटी कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. येथे कोविड रुग्णांना मोफत सुविधा उपलब्ध आहे. अनेक रुग्ण लाभ घेत आहेत.
नागलोक
कामठीरोड येथील नागलोक परिसरात बुद्धा चॅरिटी कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. त्रिरत्न बुद्धा महासंघ यांच्या वतीने हे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. येथे औषधोपचारासह रुग्णांना २४ तास सर्व सुविधा उपलब्ध आहेत.
मंगल मैत्री कोविड केअर सेंटर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेल्थ ऑर्गनायझेशन, दीक्षाभूमी स्मारक समिती, ब्लू व्हिजन, डॉ. आंबेडकर नागरी जयंती समिती यांच्या वतीने
उंटखाना येथील रमाई बुद्ध विहार परिसरात मंगल मैत्री कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. येथे सुद्धा कोरोना रुग्णांना औषध उपचारासह सर्वसुविधा उपलब्ध जरूर देण्यात आली आहे.
जगभरातून मदत
नागपुरातील हे सेवा कार्य पाहता जगभरात पसरलेल्या आंबेडकरी बौद्ध समाजबांधवही मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. ते ऑक्सिजनसह इतर आवश्यक मदत करीत आहेत.
तरुणाईही सरसावली
कोरोना रुग्णाच्या मदतीसाठी नागपुरातील तरुणही पुढे सरसावले आहेत. नागपुरात विविध ठिकाणी कोविड सेंटर सुरू करण्यात आले असून, याची सर्व व्यवस्था तरुण मूलच पाहत आहेत.