नागपूर : पालघर जिल्ह्यातील सूर्या धरणातील पाणी आरक्षण, सिंचन क्षेत्रात कपात होऊ न देता पिण्याचे पाणी आरक्षण करण्याबाबतच्या उपाययोजना, तसेच सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब करून सिंचन क्षेत्रात वाढ करण्यासंदर्भात नेमलेल्या समितीच्या शिफारशीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी विधान परिषदेत लक्षवेधीच्या उत्तरात दिली. सदस्य रवींद्र फाटक यांनी याबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.महाजन म्हणाले, राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सूर्या प्रकल्पाच्या सिंचन क्षेत्रात कमीतकमी कपात करण्यासाठी, वितरण प्रणाली सुधारणेसह सिंचनासाठी बंदिस्त नलिका वितरण प्रणाली व ठिबक सिंचनासारख्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करणे तसेच पर्यायी जलस्रोत निर्माण करण्याच्या आवश्यकतेबाबत चर्चा झाली. या बैठकीमध्ये प्रस्तुत विषयाचा अभ्यास करण्याबाबत विविध विभागांची सचिवस्तरावर समिती नेमण्यात आली आहे.या समितीचा अहवाल सहा महिन्याच्या आत मिळणार असून, त्यानंतर सूर्या प्रकल्पाबाबतची पुढील कार्यवाही केली जाईल. या चर्चेत सदस्य आनंद ठाकूर, प्रवीण दरेकर आदींनी सहभाग घेतला.
सूर्या प्रकल्पाबाबत समितीच्या अहवालानंतर पुढील कार्यवाही
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 5:50 AM