नागपूर : शहरात कोरोना संक्रमणाच्या वाढत्या प्रभावाने गेल्या आठवड्यात १५ ते २१ मार्च दरम्यान टाळेबंदी करण्यात आली होती. यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने व बाजारपेठा बंद होत्या. संक्रमणाचा वेग अजूनही मंदावलेला नाही. परंतु, प्रशासनाने व्यापारी आणि सर्वसामान्यांच्या हिताचा विचार करता सर्वच प्रकारच्या दुकानांना दुपारी ४ वाजतापर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देत टाळेबंदी ३१ मार्चपर्यंत वाढवली आहे. या अंतर्गत सोमवारी दुकाने उघडण्यास परवानगी मिळताच बाजारात सात दिवसानंतर पुन्हा एकदा उत्साह परतला.
३१ मार्चपर्यंत अंशत: टाळेबंदी घोषित केल्याने व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान, दुकानांमध्ये गर्दी वाढू नये म्हणून विशेष काळजी घेतली गेली. मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आदींचे पालन करताना व्यापारी आणि ग्राहक दिसले. त्याच कारणाने रस्त्यांवरही ग्राहक मास्क घालूनच दिसत होते. शहरातील ठोक बाजार इतवारी, भंडारा रोड, गांधीबाग आदींमध्ये ग्राहकी वाढल्याने व्यावसायिक वर्दळ वाढली होती. भांडीबाजार असो वा सराफा, सर्वच बाजारांमध्ये उत्साह दिसून येत होता. दरम्यान, बहुतांश व्यापाऱ्यांनी निश्चित वेळेत दुपारी ४ वाजता आपली दुकाने बंद केल्याने प्रशासनाला कारवाईची संधी दिली नाही. हॉटेल व्यावसायिक मात्र नाराज दिसले. त्यांना हॉटेल सुरू ठेवण्यासाठी संध्याकाळी ७ वाजतापर्यंतचाच वेळ देण्यात आला आहे. यामुळे ग्राहकी उतरली नाही. रात्रीच्या जेवणाचाच खरा व्यवसाय असतो. परंतु, ७ वाजताची मर्यादा असल्याने व्यवसाय झाला नाही.
..................