नागपूर : कोविड काळात कुणाला मदत करणे सोपे नव्हते. अशाप्रसंगी बीएपीएस स्वामीनारायण संस्थेने पुढाकार घेतला. संस्थेच्या स्वयंसेवकांनी आपला जीव धोक्यात घालून गरिबांची सेवा केली. तब्बल सव्वा कोटी लोकांना अन्नधान्य वितरित केले. इतकेच नव्हे तर वैद्यकीय सेवाही पुरवली. देशभरात ६० लाख लाेकांना बीएपीएस स्वामानारायण संस्थेच्यावतीने वैद्यकीय मदत पुरवली गेली. कोविडची दुसरी लाट अतिशय भयावह होती. कोरोना रुग्णांना बेड आणि ऑक्सिजन मिळणे कठीण होऊन बसले होते. अशावेळी संस्था धावून आली. तब्बल ४०० टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला, असे बीएपीएस स्वामीनारायण संस्थेचे धर्मगुरु ब्रह्मविहारी स्वामी यांनी सांगितले. ‘लोकमत’तर्फे आयोजित राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदेत सहभागी होण्यासाठी शनिवारी ते नागपुरात पोहोचले. यावेळी त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.
बीएपीएस स्वामीनारायण संस्था ही देशातीलच नव्हे तर जगभरातील एक प्रसिद्ध धार्मिक संस्था आहे. ही धार्मिक संस्था असली तरी धार्मिक कार्यासोबतच सामाजिक कार्यातही ही संस्था अग्रेसर आहे. या संस्थेची जगभरात १,२०० मंदिरे आहेत. उत्कृष्ट वास्तुकलेने परिपूर्ण असलेली अतिशय सुंदर अशी ही मंदिरे आहेत. संस्थेचे परदेशातील व्यवस्थापनासह संपूर्ण काम धर्मगुरु ब्रह्मविहारी स्वामी हेच पाहतात. कोविड काळात अनेक सेवाभावी कामे राबविण्यात आली. परंतु, संस्थेतर्फे वर्षभरच अशी सेवाभावी कामे सुरु असतात, असेही त्यांनी यावेळी सांगितले.