- अन्न व औषध प्रशासनावर मोठी जबाबदारी : वेळोवेळी होते तपासणी
नागपूर : जिल्ह्याची लोकसंख्या ४० लाखांपेक्षा जास्त झाली आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या अन्न व औषधांच्या सुरक्षेची जबाबदारी अन्न व औषध प्रशासनावर आहे. जिल्हा कार्यालयात एकूण मंजूर पदाएवढेच २३ अन्न सुरक्षा अधिकारी आणि औषध निरीक्षक आहेत. अधिकाऱ्यांना अन्न व औषधांच्या सुरक्षेसाठी खबरदारी घेण्याची गरज आहे.
पौष्टिक आणि शुद्ध अन्न आणि गुणवत्तापूर्ण औषधी मिळणे हा प्रत्येक नागरिकांचा हक्क आहे. याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासनावर आहे. ४० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या या जिल्ह्यात पाच हजारांपेक्षा जास्त लहान-मोठे हॉटेल्स आहेत. ४७०० पेक्षा जास्त औषध दुकाने आहेत. जिल्ह्यातील अन्न विभागाच्या सुरक्षेचा भार १२ अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांवर आणि औषध विभागाच्या सुरक्षेचा भार ११ औषध सुरक्षा अधिकाऱ्यांवर आहे. जिल्ह्यात तपासणीसाठी पुरेसे अधिकारी आहेत. कोरोना काळात तपासणी बंद असली तरीही मार्चनंतर तपासणीला वेग येणार असल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे. याशिवाय अन्न विभागातर्फे वेळोवेळी प्रतिष्ठानांची तपासणी करून निकृष्ठ दर्जाचा माल विकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते.
जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत अन्न सुरक्षा अधिकारी आणि औषध निरीक्षक कमीच आहे. अधिकाऱ्यांवर कामाचा ताण पाहता ही संख्या वाढविण्याची गरज आहे. उपलब्ध अधिकाऱ्यांकडून कामे करून घेतली जातात. पण अन्न सुरक्षा अधिकारी असो वा औषध निरीक्षक, प्रत्येक दुकानात जाऊ शकत नाही, ही सत्यस्थिती आहे.
संपूर्ण औषध दुकानांची तपासणी करणे अशक्य
जिल्ह्यात ४७०० पेक्षा जास्त औषधी दुकाने आहेत. त्यांची तपासणी करण्यासाठी ११ औषध निरीक्षक आहेत. जिल्ह्याचा विचार केल्यास एवढे औषध निरीक्षक कमी पडतात. प्रत्येक दुकानांची तपासणी करणे अशक्य आहे. लोकसंख्येच्या तुलनेत निरीक्षकांची संख्या वाढविणे गरजेचे आहे.
हॉटेल्सची तपासणी कठोर व्हावी
जिल्ह्यात १२ अन्न सुरक्षा अधिकारी आहेत. जिल्ह्यात पाच हजारांपेक्षा जास्त लहान मोठे हॉटेल्स आणि अन्य प्रतिष्ठाने आहेत. तेथील अन्न, पाणी आणि स्वच्छता तपासणीे अशक्य आहे. घडणाऱ्या घटना आणि माहितीच्या आधारे कारवाई करण्यात येते. प्रत्येक महिन्यात कारवाई करण्यात येत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मत आहे.
कोर्ट कचेऱ्या करण्यातच जातो जास्त वेळ
लोकसंख्येच्या तुलनेत अन्न सुरक्षा अधिकारी आणि औषध निरीक्षकांची संख्या कमी आहे. त्यातच दर तीन वर्षांनी त्यांच्या बदल्या होता. अन्य जिल्ह्यातून बदली होऊन अन्न सुरक्षा अधिकारी आणि औषध निरीक्षक येतो. कोर्टातील कामांचा निपटारा करण्यासाठी अन्न व औषध विभागाने स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. प्रत्येक खटल्यासाठी त्यांना न्यायालयात हजर राहावे लागते. त्यामुळे कामाचा ताण वाढतो.
कामाच्या तुलनेत अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची संख्या योग्य आहे. पण त्यांची संख्या वाढविण्याची गरज आहे. अन्न विभागाने स्वतंत्र अन्न सुरक्षा अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे. सर्वांना दर्जेदार अन्न पदार्थ मिळावे म्हणून विभागातर्फे वेळोवेळी विशेष मोहिम राबविण्यात येते. प्रतिबंधात्मक अन्न पदार्थाची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येते. सणासुदीत विशेष मोहीम राबविण्यावर विभागाचा भर असतो.
शरद कोलते, सहायक आयुक्त (अन्न), अन्न व औषध विभाग.
आकडेवारी
जिल्ह्याची लोकसंख्या ४० लाखांपेक्षा जास्त
जिल्ह्यात हॉटेल्स ५ हजारांपेक्षा जास्त
अन्न सुरक्षा अधिकारी १२
जिल्ह्यात औषधी दुकाने ४७०० पेक्षा जास्त
औषधी निरीक्षक ११