लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पेस्ट्रीची डिलिव्हरी घेऊन आलेल्या एका फूड डिलिव्हरी बॉयला ग्राहकाने लुटल्याची बाब समोर आली आहे. चाकूच्या धाकावर हा प्रकार झाला असून पोलिसांनी १२ तासांत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
कमलराव नथ्थूराम सिन्हा (२१, येरखेडा, नवीन कामठी) हा झोमॅटो कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. २ मे रोजी रात्री अडीच वाजताच्या सुमारास अज्ञात आरोपीने ॲपवरून पेस्ट्रीचा ऑर्डर दिला होता. कमलराव ताजबाग येथील यासीन प्लॉटमधील फारूख पानठेल्याच्या मागील गल्लीत ऑर्डर घेऊन पोहोचला. कॅश ऑन डिलिव्हरीचा ऑर्डर असल्याने कमलरावने संबंधित व्यक्तीला पैसे मागितले. तेव्हा ऑर्डर करणाऱ्या व्यक्तीने चाकूचा धाक दाखवून त्याचा मोबाईल, रोख पाचशे रूपये व पेस्ट्री असा २४ हजारांचा मुद्देमाल हिसकावला व पळ काढला. या प्रकाराने हादरलेल्या कमलरावने सक्करदरा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला व गुन्हेशाखेच्या युनिट चारच्या पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी सायबर पथकाच्या मदतीने ॲपवरील माहिती काढली. तसेच तांत्रिक तपासाच्या माध्यमातून रिजवान उर्फ रिज्जू रहमत बेग (१९, हबीबनगर, गाडगेनगर, अमरावती) याला ताब्यात घेतले. त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून मोबाईल, चाकू जप्त करण्यात आले असून त्याला सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक रमेश ताले, वैभव बारंगे यांच्या पथकाने ही कारवाई केली.